You are here:
Bhosale

‘भोंसले’ सिनेमा : मराठी माणूस आणि भाषिक लढ्याचं विकृत चित्रण

आपल्याकडे एक असाही चित्रपट आहे जो प्रदर्शित झाला २०१८ मध्ये आणि अभिनेत्याला पुरस्कार मिळाला २०२१ मध्ये. तो सुद्धा राष्ट्रीय पुरस्कार! तो चित्रपट, दिग्दर्शक देवाशिष माखिजा आणि अभिनेता मनोज बाजपेयीचा ‘भोंसले’. २०१८ साली देवाशिष माखिजाचा भोंसले चित्रपट बुसान फिल्म फेस्टिवलमध्ये दाखवला गेला. नंतर तो सोनी लिव्ह ओटीटीने प्रस्तुत केला. माखिजाने शाद अली आणि अनुराग कश्यपला दिग्दर्शनात सहाय्य केल्यानंतर आजी, तांडव अशा इंडी फिल्म्स दिग्दर्शित केल्या. भोसलेमध्ये मनोज बाजपेयी सोबत त्याने दुसऱ्यांदा काम केलंय. भोसलेसाठी मनोज बाजपेयीला नॅशनल फिल्म अवॉर्ड्समधील बेस्ट ऍक्टर हा पुरस्कारही मिळाला आहे. हे कौतुकास्पद आहे तरीही भोसले एक चित्रपट म्हणून फार एकांगी अजेन्डा रेटतो.

असं काय आहे भोसलेमध्ये?

विलास एक टॅक्सी ड्रायव्हर आहे. एका स्थानिक नेत्याच्या नजरेत येण्यासाठी धडपड करणारा तरुण. विलासला हवं आहे निवडणुकीचं तिकीट. नेत्याला हवी आहेत विभागातली मराठी मतं. विलास प्राणपणाने हा मुद्दा लावून धरतोय. निवृत्त पण सर्व्हिस वाढवायला आपल्या वरिष्ठांना भेटण्याची धडपड करणारे गणपत भोसले ज्या चर्चिल चाळीत राहतात तिथे विलासला मराठी मतांचं एकगठ्ठा ध्रुवीकरण करायचं आहे. त्यासाठी तो भोसलेंना सुद्धा विनंती करतो. आता या भोसलेंना चाळीत मान आहे कि नाही तो सुद्धा गोंधळ आहे पण ते जाऊ दे. मुद्द्याचं म्हणजे विलासला यावेळी चाळीतला गणपती फक्त मराठी माणसांनीच बसवलेला हवाय. उत्तर भारतीयांचं प्रतिनिधित्व करणाऱ्या राजेंद्रला विलास मारहाण करतो आणि वर किंचाळून अख्ख्या चाळीला सांगतो कि इथे फक्त मराठी माणसांचाच गणपती बसणार. थोडक्यात मराठी माणसांचीच मर्जी चालणार. “ये हमारा भी मुलुख हैं” असं म्हणणाऱ्या राजेंद्रला तो ढकलून देतो. राजेंद्रला त्याचे वडील म्हणतात ‘कशाला हव्यात ह्या भानगडी? मुंबईत आजकाल काय चाललंय माहित आहे ना?”

नेमक्या याच पॉइंटला हा सिनेमा महत्वाचा वाटू लागतो. वर वर पाहता ही गोष्ट Xenophobia म्हणजे टोकाचा राष्ट्रवाद (इथे प्रांतीयवाद) विरुद्ध Humanity अशी आहे, असा दावा फिल्ममेकर करू शकतात. पण शेवटी सिनेमासारखं प्रभावी माध्यम वापरून एखादा लेखक दिग्दर्शक काय सांगू पहातो हे काही इतकं ढोबळ नसतं. त्यात अनेक गर्भित अर्थ असू शकतात, छुपा हेतू असू शकतो. राजकारण असू शकतं.

जेव्हा राजेंद्रचा बाप राजेंद्रला दटावतो “मुंबई में आजकाल क्या चल रहा हैं पता हैं ना?” तेव्हा ते एखाद्या सिनेमामध्ये प्रतिबिंबित होणारे निव्वळ तत्कालीन सामाजिक, राजकीय संदर्भ नसतात तर महाराष्ट्रात विशेषतः मुंबईमध्ये मराठी भाषेच्या अस्तित्वासाठी, आग्रहासाठी चाललेलं आंदोलन दिग्दर्शक मखीजा दाखवतात असं नाही. तर हा संघर्ष मांडताना ते असं नॅरेटीव्ह पण सेट करतात की मराठी माणसं ‘झेनोफोब्झ’ आहेत, तसेच मराठीचा आग्रह माणुसकीच्या विरुद्ध आहे. अशाप्रकारे दिग्दर्शक एकांगी मत मांडण्याचं स्वातंत्र्य घेतो.

भोंसले हा सिनेमा एकांगी चित्रण करतो असा आरोप करण्यास वाव आहे. कारण मराठीचा आग्रह धरणारे पात्रं म्हणजे विलास आणि तो ज्याची हुजरेगिरी करतोय तो नेता हे दोघेही जण मराठीच्या प्रेमाखातर नव्हे तर स्वार्थ साधण्यासाठी मराठीचा मुद्दा उचलून धरतायत असं  दाखवलं आहे. एका प्रसंगात उत्तर भारतीय राजेंद्रच्या हातात वर्तमानपत्र आहे आणि त्यात बातमी आहे की रेल्वे भरतीमध्ये फक्त मराठी तरुणांना संधी मिळणार, परप्रांतीयांना नाही. राजेंद्र ही बातमी मोठ्याने वाचतो आणि चरफडतो. या सगळ्या गोष्टी प्रेक्षकांच्या मनात मराठी माणूस आणि मराठी भाषेबद्दल नकारात्मक भावना निर्माण करतात. खरंतर स्थानिक भूमिपुत्रांना प्राधान्य ही प्रत्येक भारतीय राज्याची जबाबदारीच आहे. त्यात चूक काय?

आणखी एक प्रसंग. भोंसलेंच्या शेजारी राहायला आलेली उत्तर भारतीय भाडेकरू मुलगी आणि तिचं सामान घेऊन आलेला माणूस यांच्यात भाड्यावरून तणातणी चालली आहे. तो भाड्याचा आकडा मराठीत सांगतोय आणि तिला ते कळत नाही. हा प्रसंग सुद्धा अतिशय खोटा, बेतलेला वाटतो कारण खुद्द मराठी माणसंच मुंबईत एकमेकांशी बोलताना सुद्धा कधीकधी हिंदी वापरतात. इतक्या टोकाचा मराठीचा आग्रह धरणारा हमाल खोटा वाटणार नाही तर काय? मुळात कष्टकरी जनता इथं कामासंबंधी एकमेकांशी हिंदीत सहज संवाद साधते. तसं पाहता मुंबईत हिंदीच बोलीभाषा झालीय हे कटू वास्तव आहे. मराठी भाषिक आंदोलनाचा खरंतर कळीचा मुद्दा हाच आहे. महाराष्ट्राच्या राजधानीत मराठी डावलली जातेय. पण ही दुसरी बाजू माखिजाच्या भोसलेंमध्ये दिसतच नाही. चित्रपटातील विलास हे पात्र अतिशय हिंसक आणि दुष्कृत्य करणारं आहे पण भोसले स्व्हतह मराठी असून सहृदय आहे. आता ही मांडणी बघा. मराठी असूनही… म्हणजे अधिकांश मराठी माणसं भाषिक दुराभिमान असणारी, (हे वाचतानाही विनोदी वाटतं इतके मराठी भाषेबद्दल मराठी लोक निदान मुंबईत तरी उदासीन आहेत) मराठी जनता दुष्ट किंवा इतर भाषिकांचा दुस्वास करणारी आहे, असं एकतर्फी चित्र या सिनेमात उभं करण्यात देबाशिष माखिजा यशस्वी ठरतो.

माखिजा यशस्वी ठरतो कारण तो चांगला फिल्ममेकर आहे. सिनेमामधून दिग्दर्शक त्याला हवं ते आणि हवं तसं मांडू शकतो हे त्याच्या पथ्यावर पडलं आहे. त्याने चित्रपटाचं नावसुद्धा मराठी मनाचा मानबिंदू असलेल्या मराठी महापुरुषाच्या आडनावावरून ठेवलं आहे. भोसलें सिनेमाची कथनशैली अतिवास्तववादी असल्याने चित्रपट अंगावर येतो. अमराठी माणसांना, खासकरून मराठी भाषा आंदोलनाची पार्श्वभूमी माहीत नसलेल्यांना यात मराठी भाषिक आंदोलनाचं फक्त आक्रमक, jingoistic, manipulative रूप दिसतं. ज्याला ‘Distortion of the whole purpose and meaning’ असं आपण म्हणू शकतो.

मराठी भाषा आंदोलन का महत्वाचं आहे?

कुठलीही भाषा ही अस्मितेपेक्षा अस्तित्वाची खूण असते. खरंतर महाराष्ट्राच्या राजधानीत मराठी माणसाला स्वतःच्या भाषेसाठी आंदोलन करावं लागणं ही लाजिरवाणी गोष्ट आहे. मुंबई अनेकरंगी आणि बहुभाषिक आहे. मुंबईत मराठी माणसांची संख्या जास्त असूनही, ती मराठी माणसांची आणि महाराष्ट्राची असूनही इथं प्रामुख्याने हिंदी अधिक बोलली जाते. अनेक पातळ्यांवरून हिंदीचं आक्रमण मराठी जनतेवर झालेलं आहे, होत आहे. अगदी शालेय शिक्षणातूनही हिंदी अनिवार्य करण्याचा काही राजकारण्यांचा प्रयत्न अलीकडे हाणून पाडला गेलाय. या प्रकरणात मराठी जनतेची अभूतपूर्व एकी दिसली. तरीही मुंबईत मराठी माणसांना मुद्दाम डिवचण्याचा प्रयत्न काही अमराठी घटकांकडून होतोय. छुप्या पद्धतीचे अनेक प्रयत्न होतायत. हे आताच होतंय असं नाही. भाषावार प्रांतरचना होऊन महाराष्ट्र आणि गुजरात ही वेगळी राज्यं झाल्यानंतरही मुंबईसाठी महाराष्ट्राला झगडावं लागलं आणि तब्बल १०७ हुतात्म्यांचा बळी देऊन मुंबई महाराष्ट्रात आली. त्यानंतरही मुंबईला महाराष्ट्रापासून वेगळं करण्याचं कारस्थान महाराष्ट्र द्वेषींकडून होतच राहिलं आहे.

इथे महाराष्ट्रद्वेष हा आरोप कुठल्याही paranoia किंवा न्यूनगंडामधून केलेला नाही. मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे. ती महाराष्ट्रात आहे. मुंबईत मराठी माणसाचं संख्याधिक्य आहे. साहजिकच बाकीचे जे minority मध्ये आहेत म्हणजे अमराठी आहेत ते एकवटणारच. याला minority complex म्हणतात. आजही मुंबईतील मराठी माणसांचं महत्व कमी कसं होईल या मागे राजकीय सामाजिक ताकद लागली आहे म्हणूनच मराठी भाषा आंदोलन फार महत्वाचं आहे.

दुसरं महत्वाचं कारण म्हणजे सांस्कृतिक अतिक्रमण हे राजकीय सत्तालालसेचं प्यादं असत. सांस्कृतिक अतिक्रमण हे समाजाचा आणि येणाऱ्या पिढ्यांचा चेहरामोहरा बदलून टाकणारं असतं. चित्रपटमाध्यम अशा अतिक्रमणाच्या अनेक साधनांपैकी एक आहे. आणि अतिशय घातक म्हणावं इतकं प्रभावी आहे. कारण आपण भारतीय गोष्टीवेल्हाळ आहोत. गोष्टी सांगता ऐकता आपण त्यातलं खरं खोटं विसरून जातो. मराठी लग्न पद्धतीत उत्तरेच्या संगी विधीने कधी प्रवेश केला आणि आपण त्या तालावर कधी नाचू लागलो हे आता आठवतही नाही. एखादी संस्कृती नष्ट होते त्यात पहिला बळी भाषेचा जातो. भाषा भ्रष्ट करून नष्ट केल्या जातात. नवी संस्कृती उदयाला येते आणि नवे शासक. मुंबई, महाराष्ट्र आणि मराठी भाषा या तिन्ही घटकांसमोर हे आक्रमण आधी छुप्या पद्धतीने होतं पण गेल्या काही वर्षातली महाराष्ट्रातली राजकीय परिस्थिती बघता या आक्रमणाने, पर्यायी आक्रमणकर्त्यांनी उघड-उघड शड्डू ठोकले आहेत. कारण मुंबई हातात आली की देशाच्या आर्थिक नाड्या हातात आल्या.

सिनेमा हे भाषेसाठी महत्वाचं साधन

मराठी माणसाने हे कारस्थान किंवा आक्रमण कधीही गांभिर्याने घेतलं नाही. उलट हिंदी चित्रपटसृष्टी मुंबईत स्थिरावली, बहरली आणि इथे हिंदी जोमाने पसरली यात मराठी प्रेक्षकांचा मोठा सहभाग आहे. याच काळात मराठी भाषेला, भाषिकांना होणारा धोका ओळखून शिवसेनेसारख्या संघटना उभ्या राहिल्या. त्यांचे राजकीय पक्ष बनले. मात्र ‘बॉम्बे’चं ‘मुंबई’ होण्यापलीकडे हिंदीच्या वर्चस्वाला कोणीही शह देऊ शकलं नाही. मराठी माणसाला भूमिपुत्र म्हणून न्याय मिळवून देऊ शकलं नाही. स्थलांतरितांचे लोंढे येतच गेले. याच वेळी हिंदी भाषा इथे मांड ठोकून बसली. कारण हिंदी भाषेकडे असलेला हुकुमी एक्का, हिंदी सिनेमा. दुःख हे आहे कि मराठी नाटक किंवा सिनेमाने ही ताकद कमावली नाही. काही काळ दादा कोंडके, त्या नंतरच्या काळात मिलेनियममधले काही मराठी चित्रपट वगळता विशेष काही घडलं नाही. भाषा म्हणून सिनेमामधून आपला ठसा उमटवायला मराठी सातत्याने अपयशी ठरली आहे. मराठीतील कलाकारांनी एक नाना पाटेकर वगळता हिंदीमध्ये मराठी संस्कृतीची दादागिरी केली नाही. आशाताईंनी महासंग्राम फिल्ममध्ये ‘झाला मला प्रेम झाला’ असं चक्क सदोष मराठी गीत गायलं आहे. त्यावर माधुरी दीक्षितसारखी मराठी नटी नाचली आहे. सगळाच आनंद आहे.

या उलट हिंदी सिनेमामध्ये मिलेनियम युगात आलेले उत्तर भारतीय दिग्दर्शक हे तिथल्या मातीचा गंध, तिथली संस्कृती ठळकपणे घेऊन येऊ लागले. विशाल भारद्वाज, अनुराग कश्यप, तिगमांशू धुलिया, आनंद एल राय यांनी उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड इथल्या कथा, तिथली माणसं उभी केली. तिथली भाषा, भाषेचे सूर, गाणी, लोकगीतं वापरली. मुंबई आणि महाराष्ट्राच्या प्रेक्षकाने ते ही आवडून घेतलं. ‘इ का बवासीर बना दिये हो’ किंवा ‘कह के लुंगा’ हे एखादा मराठी तरुणही सहज बोलू लागला. एक गोष्ट या दिग्दर्शकांच्या पथ्यावर पडली ती म्हणजे महाराष्ट्र राज्याने विशेषतः मुंबईने आधीच हिंदी आत्मसात केलीय. मुंबईत वसलेल्या हिंदी चित्रपटसृष्टीचं अस्तित्व आपल्याला हेच सांगतं. आपण भारतीय लोक सिनेमाचे चाहते असल्याने आणि मुंबई बहुभाषिक असल्याने हिंदी सिनेमा हा तमाम जनतेचा दुवा बनलाय.

मराठी भाषेचा आणि संस्कृतीचा हिंदी सिनेमातून दुस्वास

चित्रपटातून दिसणारं जग, संस्कृती ही आपली नसली तरी ते न जाणवता त्याच्या प्रेमात पडायला लावणारी जादू आहे सिनेमा या माध्यमाची. म्हणूनच ‘ज़रा हट के ज़रा बच के ये हैं बॉम्बे मेरी जां’ असं गाणं मुंबईच्या लोकांना खटकलं नाही. खटकणार ही नाही. मुंबईचा प्रभाव आणि दुस्वास हा मुंबई बाहेरच्या लोकांच्या सिनेमातून दिसत राहिला आहे. ‘जादू टोने की डगरिया तू देख बबुआ’ म्हणत हिंदी सिनेमात मुंबई नेहमी परप्रांतीय सिनेमावाल्यांच्या दृष्टीने दिसत राहिली आहे. गाव चांगलं आणि शहर वाईट ही ढोबळ मांडणी करताना मुंबई शहर नेहमीच स्वार्थी लोकांचं शहर दाखवलं गेलं आहे. पण मग मुंबईमध्ये इथल्या स्थानिक लोकांचं काय? त्यांच्या काही कथा-व्यथा नाहीतच का? नाही म्हणायला नासिर हुसेन यांचा ‘बहारों के सपने’  मुंबईतल्या गरीब जनतेच्या जीवनात डोकावतो. किंवा सत्तरच्या काळात सुरू झालेल्या समांतर सिनेमामधून म्हणजे ‘चक्र’ वगैरे सिनेमांमधून मुंबईचं वास्तव दर्शन होतं. पण हिंदी सिनेमाचं जग हे नेहमीच उत्तर भारतीय लोकांचं जग राहिलेलं आहे. तिग्मांशू धुलियासारखा दिग्दर्शक तर उघडपणे म्हणतो, “हिंदी सिनेमात मुंबई दाखवता किंवा ते जग दाखवता ज्या जगाची मुळात हिंदी ही भाषाच नाही. हिंदी चित्रपटांत हिंदी पट्ट्यातल्या कथा का दिसत नाहीत?”

अर्थात तिग्मांशू आणि अनुराग कश्यप, विशाल भारद्वाज या लोकांनी ह्या cow belt मधल्या कथा आपापल्या चित्रपटांतून मांडल्याच आहेत. पण मग प्रश्न असा आहे की मुंबईत हिंदी बोलली जात नाही असं कश्यप, धुलिया प्रभृतींना म्हणायचं आहे की काय? कि इथल्या लोकांच्या कथाच नाहीत आणि असल्या तरीही हिंदीत त्यांनी त्या मांडू नयेत. म्हणजे राहुल रवैलने अर्जुन मालवणकर हे पात्र घेऊन हिंदी सिनेमा करायला नको होता? एक गंमत म्हणून आनंद एल राय यांच्या रांझनाचं उदाहरण देतो. चित्रपटाचा नायक कुंदन दाक्षिणात्य आहे पण त्याचं कुटुंब वाराणसीमध्ये स्थायिक झालं आहे. म्हणून कुंदन अस्खलित हिंदी बोलतो. आता कल्पना करा, हेच कुटुंब मुंबईत महाराष्ट्र राज्याच्या राजधानीत दाखवलं असतं तर कुंदन मराठीत बोलला असता का?

सिनेमातून सांस्कृतिक राजकारण

समस्या अशी आहे की बऱ्याचदा भारद्वाज, धुलिया यांच्यासारखे मेकर्स त्यांच्या सांस्कृतिक मुळांचा अभिनिवेश सोडायला तयार नसतात. भोसलेंचा निर्माता, दिग्दर्शक किंवा अभिनेता मनोज बाजपेयी देखील यापेक्षा वेगळे नाहीत. भारद्वाज, धुलियाकडे नक्कीच त्यांच्या मातीतल्या सांगण्यासारख्या कथा असतील, पण म्हणून इथल्या मातीत कथाच नाहीत आणि असल्या तरी त्यांचं हिंदीत प्रयोजन काय असा दृष्टिकोन सिनेमा या माध्यमाच्या तत्वालाच हरताळ फासणारा नाही का? एखादा ‘तुंबाड’ किंवा ‘बाजीराव मस्तानी’ बघतांना आपल्याला हा प्रश्न पडतो का? सिनेमाची भाषा आणि सिनेमातली भाषा हे दोन वेगळे मुद्दे आहेत. सिनेमा अती जटिल बनू नये म्हणून सिनेमातली पात्रं एक समान भाषा बोलत असतात. प्रेक्षकांच्या belief system मध्ये तितकं मान्य असतं, अन्यथा हॉलिवूडचे हिंदी डब सिनेमा इथे चाललेच नसते.

दुसरं म्हणजे आपला सांस्कृतिक अभिनिवेश सोडायला तयार नसणारे हे लोक यात सत्तर ऐंशीच्या दशकातले मेकर्स सुद्धा आले, यांना मग मुंबई आणि महाराष्ट्राच्या संस्कृतीला एकतर नकारात्मक रंगात दाखवायचं असतं किंवा कमजोर. यांना इथे मुंबईत यश मिळालं, बंगले बांधले की मग मुंबई, इथली माणसं, दगदग, fast life थोतांड वाटू लागतं आणि आपल्या गाव, छोट्या शहरातलं आयुष्य उबदार वाटू लागतं. कुठूनही कधीही ही माणसं या शहराला, इथल्या भाषेला, माणसांना आपलं मानत नाहीत. स्वतः उपऱ्यासारखे वागतात, आणि इथल्या लोकांना दोष देतात. साधी गोष्ट आहे, जेव्हा तुम्हाला समोरच्याच्या identity चा, संस्कृतीचा xenofobia म्हणेपर्यंत त्रास होतो किंवा असं तुम्ही तुमच्या अभिव्यक्तीमधून मांडत असता तेव्हा तुम्ही कळत नकळत आपली संस्कृती समोरच्यावर लादत असता किंवा स्वतःचा संकुचित दृष्टिकोन बदलायला तयार नसता. ज्या प्रदेशात तुम्ही स्थलांतरित म्हणून जाता, रुजायला बघता तिथली संस्कृती भाषा मात्र तुम्हाला अमान्य असते. तुम्ही जे गाठोडं घेऊन आलायत तेच तुम्हाला उतरवायचं नसतं. कर्नाटकात सुद्धा याच मुद्द्यावरून रान पेटलेलं आहे.

स्थलांतरितांच्या दृष्टिकोनातून बघणाऱ्या आणि मराठी भाषेचं आंदोलन हे राजकीय हत्यार म्हणून दाखणाऱ्या या सर्व फिल्ममेकर्सना माझा एकच प्रश्न आहे, ज्या-ज्या राज्यातून स्थलांतरं होत आहेत त्याचं कारण असलेलं त्या-त्या राज्यातील शोषक राजकारण, गरीब जनतेचं दमन, जातीयवाद आणि सरकारी निधीचा अपहार करणाऱ्या व्यवस्थेला आपल्या अभिव्यक्तीमधून, चित्रपटातून का फटकावत नाहीत? बिहार, उत्तरप्रदेशच्या स्थलांतरितांना फक्त महाराष्ट्र नव्हे तर भारतातील इतर अनेक राज्यांमधून कडवा विरोध होतोय ते तिथल्या लोकांच्या बुरसटलेल्या विचारसरणी आणि ओंगळवाण्या व्यवहारामुळे.  याकडे भारद्वाज, कश्यप आदी मंडळी का दुर्लक्ष करतात? बिमारू राज्यातील गुन्हेगारीवर मनोरंजक सिनेमा थोडक्यात Crime Porn बनवून पैसे कमवायचे असाच धंदेवाईक दृष्टिकोन आहे का यांचा?

मी तर म्हणतो कश्यप, भारद्वाज यांनी उत्तर भारतातल्या गुन्हेगारीला ग्लॅमर मिळवून दिलं जसं सलीम जावेद, राम गोपाल वर्मा यांनी मुंबई अंडरवर्ल्डला दिलं. ओंकारा, गँग्ज ऑफ वासेपूर यातून उत्तर भारतीय सरंजामी, वर्णवादी, पुंड मनोवृत्तीचं उदात्तीकरण नाही तर काय? विशाल भारद्वाज यांच्या कमीनेमध्ये खलनायक भोपे हा कट्टर मराठीचा पुरस्कर्ता आहे. हे भोपेचं पात्र तद्दन टिपिकल उथळ खलनायकी आहे. त्यामुळे होतं काय की मराठीचा आग्रह धरणारे सगळे भोपेच्या रांगेत बसवले जातात. यालाच विकृतीकरण किंवा distortion म्हटलं पाहिजे. मराठी भाषेच्या आंदोलनाचं असं reductionism होतंय. अगदी हिंदी वृत्तवाहिन्या किंवा एखादा रवीशकुमारसारखा पत्रकार सुद्धा हे सर्रास करताना दिसतो.

असं बघायला गेलं तर धुलिया, भारद्वाज, कश्यप, मखीजा, बाजपेयी, राय सगळे उच्चवर्णीय, आर्थिक दृष्ट्या सुस्थितीत वाढलेले आहेत. यांनी कधी नीरज घायवानसारखं जातीयवादाला, सामाजिक विषमतेला हात घातल्याचं उदाहरण नाही. यांची अस्मिता उत्तर भारतीय सवर्णवादी आहे. त्यामुळे आपली भाषिक, भौगोलिक ओळख यांना सोडता येत नाही. उलट ती ठसवण्याचा प्रयत्न यांच्या सिनेमातून असतो. जे विशाल भारद्वाज ‘कमीने’ मध्ये मराठीच्या कट्टर समर्थक भोपेला खलनायक करतात, तेच भारद्वाज ओमकारामध्ये बाहुबली संस्कृतीचं उदात्तीकरण करतात, त्यात heroism आणतात. याला म्हणतात Cinematic Cultural Manipulation. आमची संस्कृती तुमच्या संस्कृतीपेक्षा श्रेष्ठ कशी हे दाखविण्याचा हा प्रयत्न आहे.

देवाशिष माखिजाच्या भोसलेंमध्ये उत्तर भारतीय राजेंद्र जेव्हा मराठीच्या आग्रहाविरुद्ध उठाव करू पाहतो तेव्हा विलास त्याला मारहाण करतो. पोलीस मात्र राजेंद्रलाच उचलून नेतात. नंतर मारहाण करून सोडून देतात. राजेंद्र चाळीत परत येतो तेव्हा त्याचा वर्षानुवर्षे इथे राहिलेला बाप जे काही म्हणतो ते वर लिहिलेलं आहेच. हा संवाद पुढे चालतो तेव्हा बापाला राजेंद्र म्हणतो, “तो विलास इतकं मराठी मराठी करतो त्याला कोण बोलत नाही.” त्यावर राजेंद्रचा बाप म्हणतो, “उनमे और हममे फरक हैं. आपल्याला कामधंदे आहेत.”  थोडक्यात मराठी माणसं आणि त्यांचा मराठीचा आग्रह या गोष्टी कट्टरतावाद व निरर्थक वाद आहेत आणि त्या गरीब बिचाऱ्या स्थलांतरित कष्टकरी जनतेवर यांचा जुलूम होतोय. ‘भोसलें’मध्ये अशा चोराच्या उलट्या बोंबा आहेत.

हीच हिंदीची दडपशाही आहे. ही दडपशाही आणि सांस्कृतिक अभिनिवेश आपल्याला मुंबई बाहेरून आलेल्या फिल्ममेकर्सच्या सिनेमात पहायला मिळतो. हा अभिनिवेश आपल्याला कळायला पाहिजे. एखाद्या उत्कट सिनेरसिकाप्रमाणे निव्वळ चांगल्या सिनेमाला दाद देऊन गप्प बसता कामा नये. यांची पडद्यामागची छुपी मानसिकता expose करायला हवी.  प्रांतीयवादी, संकुचित विचारसरणी, Jingoistic, Xenophobes म्हणून यांनी आपल्याला कितीही हिणवलं तरी त्याला gas lighting म्हणतात हे लक्षात ठेवा.

गुरुदत्त सोनसुरकर

गुरुदत्त सोनसुरकर, जाहिरात व्यावसायिक आहेत. इंटरनेटच्या सुरुवातीच्या काळातच त्यांनी डिजिटल मार्केटिंग आणि जाहिरातक्षेत्रात मुसंडी मारली. या क्षेत्रात प्रतिष्ठेचे असे ABBY, AAAI आणि IDMA असे पुरस्कार त्यांनी मिळवले आहेत. काही काळ त्यांनी 9X झकास या मराठी संगीत वाहिनीचे व्हाइस प्रेसिडेंट पद भूषवले आहे. डिजिटल चित्रपट वितरण क्षेत्रात अमेझॉन प्राईम करता मराठी चित्रपटांची निवड करण्याचं काम त्यांनी पाहिलं आहे. ते सर्व भाषिक सिनेमांवर सातत्याने लेखन करतात. त्यांनी अन्य सहकाऱ्यांसह सुरू केलेला ‘सिनेमागल्ली’ हा सोशल मीडिया समूह अत्यंत लोकप्रिय आहे. मराठी ललित ‘वर्ख’ आणि हिंदी कविता ‘यादों का गुलमोहर’ ही पुस्तकं प्रसिद्ध. सध्या हिंदी, इंग्रजी सिनेमांसाठी You Tube आणि Meta या प्लॅटफॉर्म्सवर कन्टेन्ट मॉनेटायझेशनची जबाबदारी सांभाळतात.