फेब्रुवारी २०१६ च्या सुरुवातीची ती सकाळ अजूनही हिवाळ्याच्या गारव्यानं भरलेली होती. रोजच्याप्रमाणे पहाटेची फेरी झाल्यावर वर्तमानपत्र हातात घेतलं, आणि एक बातमीने मन सुन्न झालं, उर्दू साहित्यातील थोर लेखक इंतज़ार हुसैन यांच्या निधनाची बातमी. भारतीय वंशाचे हे पाकिस्तानी साहित्यिक, ज्यांना २००७ साली भारतातील राष्ट्रीय साहित्य अकादमीनं प्रेमचंद फेलोशिप देऊन गौरवलं होतं. त्यांच्या मृत्यूची बातमी वाचताना मन आपसूकच आठवणीत हरवून गेलं. फाळणीनंतर ते पाकिस्तानात स्थायिक झाले खरे, पण त्यांच्या मनाचं गाव मात्र कायम भारतातच होतं. बीबीसी उर्दूला दिलेल्या एका मुलाखतीत त्यांनी हे खुलेपणानं कबूल केलं होतं. २०१२ साली त्यांनी आपल्या मूळ गाव डिबाई (उत्तर प्रदेश) येथे येऊन वडिलोपार्जित घर पाहिलं, आणि डोळ्यांतून आनंदाश्रू वाहू लागले होते.
२०१३ साली जेव्हा त्यांची प्रसिद्ध कादंबरी ‘बस्ती’ मॅन बुकर आंतरराष्ट्रीय पुरस्काराच्या यादीत सामील झाली, तेव्हा जगभरातील साहित्यवर्तुळांचं लक्ष त्यांच्याकडे वळलं. भारत, पाकिस्तान आणि फ्रान्स या तिन्ही देशांनी त्यांना साहित्यसन्मानांनी गौरवलं. त्यांच्या ‘बस्ती’ या कादंबरीचा विचार करताना लक्षात येतं की, ती केवळ एका देशाच्या इतिहासाचं प्रतिनिधित्व करत नाही, तर संपूर्ण भारतीय उपखंडाच्या सामूहिक स्मृती, विभाजनाचं दुःख, आणि सांस्कृतिक गुंतागुंत यांचं एक प्रकारचं जिवंत दस्तऐवजीकरण आहे. ‘बस्ती’मुळे इंतज़ार हुसैन यांचं साहित्य केवळ देशाच्या सीमारेषांपुरतं मर्यादित न राहता, उपखंडाच्या सामूहिक जखमा आणि आठवणी यांचं सार्वकालिक प्रतिक बनून गेलं.
‘बस्ती’ कादंबरी मॅन बुकर आंतरराष्ट्रीय पुरस्काराच्या यादीत आली आणि ती वाचण्याची उत्कंठा अधिकच वाढली. पण उर्दू भाषेचं अपुरं ज्ञान आडवं आलं. त्यामुळे मूळ संहितेऐवजी प्रोफेसर फ्रांसिस डब्ल्यू प्रिटचेट यांचा इंग्रजी अनुवादच वाचावा लागला. भाषेचा गाभा आणि भावना समजून घेण्यासाठी खूप प्रयत्न करावे लागले. ते करताना जाणवलं, भारतीय उपखंडाचा सांस्कृतिक इतिहास समजण्यासाठी उर्दूचं ज्ञान किती आवश्यक आहे! याच जाणिवेने पुढे उर्दू शिकण्याची प्रेरणा दिली. भाषेच्या अभ्यासातून उर्दूचं सौंदर्य आणि तिचं खोल भारतीयत्व उलगडत गेलं. हेच अधोरेखित करणे हा या लेखनाचा खरा हेतू आहे.
उर्दू ही भाषा भारतीय आहे, हे सांगताना एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी, जरी मुस्लीम आक्रमकांच्या आगमनामुळे तिच्या इतिहासाची सुरुवात झाली असं मानलं जात असलं, तरी उर्दूचा खरा विकास भारतातच झाला. ‘दिल्ली सल्तनत’ आणि नंतर ‘मुगल साम्राज्य’ यांच्याशी संबंधित इंडो-इस्लामिक कालखंडात उर्दूने एक स्वतंत्र भारतीय भाषेचा चेहरा मिळवायला सुरुवात केली. तिचा पाया होता दिल्ली परिसरातील खडीबोली, ब्रजभाषा आणि इतर स्थानिक लोकभाषा. त्यात अरबी आणि फारसी भाषांचा शब्दसंपत्तीपुरता प्रभाव होता. पण उर्दूचा ढाचा, गाभा आणि संस्कार पूर्णपणे भारतीय होते. स्थानिक बोलीभाषांच्या संमीलनातूनच उर्दूचा जन्म झाला आणि ती उपखंडातील एक स्वतंत्र, समृद्ध आणि मूळ भारतीय भाषा म्हणून विकसित झाली.
‘उर्दू’ हा तसा ‘तुर्की’ शब्द असला तरी त्याचे मूळ ‘चिनी’ भाषेत आहे. ‘ह्यंगे हो’ नदीच्या ‘ओर्दुस’ खोऱ्यातील टोळ्यांना ‘ओर्दू’ म्हणत, ज्या नंतरच्या काळात तिथून सर्वत्र विखुरल्या. तुर्की भाषेत उर्दू या शब्दाचा अर्थ लष्करी छावणी होतो, त्यामुळे छावणीतील बाजारात वापरल्या जाणाऱ्या संवादाची भाषा म्हणून ‘उर्दू’ ही संकल्पना उदयास आली. ‘शम्सुर्रहमान फ़ारुक़ी’ हे ज्येष्ठ उर्दू साहित्यिक, समीक्षक आणि सिद्धांतकार. ‘उर्दु का आरंभिक युग’ या पुस्तकात ते मांडतात, ‘पूर्वी शहर किंवा मौहल्ला, शहाजहानाबाद अर्थात दिल्लीतील बाजाराच्या गल्लीची भाषा आणि तटबंदी असलेले शहर या अर्थाने दिल्ली शहराला व फारसी भाषेलाही पर्यायी शब्द म्हणूनही उर्दु हा शब्द वापरत असत.’ त्यासाठी कवी ‘मुसहफ़ी’ यांच्या काव्याचा दाखला देवून ते ‘ज़बान-ए-उर्दु-ए-मुअल्ला’ असा भाषिक संदर्भही देतात.
उर्दू काव्याच्या बाबत सर्वात पहिला संदर्भ आढळतो तो मसूद साद सलमान (इसवी १०४६ ते ११२१) यांच्या काव्याचा. नंतर उर्दू भाषेच्या प्रारंभीक स्वरूपाची कल्पना करता येते ती भारतभर भ्रमण करणाऱ्या सूफी संतांच्या दोहे आणि पदांच्या माध्यमातून. बाबा फरीद शकरगंज (इसवी ११७३ ते १२६६) यांचे काव्य त्याची साक्ष देते. त्यांच्या संपादित दोह्यांचा शिखधर्मीयांच्या आदि ग्रंथ ‘गुरुग्रंथ साहिब’ मध्ये समावेश आहे.
उर्दू भाषेच्या आरंभिक विकासक्रमात सूफ़ी परंपरेतील अमीर ख़ुसरो (इसवी १२५३–१३२४) यांचे योगदान अत्यंत महत्त्वाचे आहे. ते बहुभाषिक होते. वडील तुर्क आणि आई भारतीय असलेले ख़ुसरो स्वतःला ‘तुर्की हिन्दुस्थानी’ म्हणवत. त्यांना आपली मातृभाषा असलेल्या तत्कालीन हिन्दवी भाषेविषयी जी पुढे चालून उर्दू म्हणून प्रचलित झाली, विशेष ममत्व होते. काव्यलेखनासाठी त्यांनी तिचाच वापर केलेला आहे.
अमीर ख़ुसरो केवळ कवीच नव्हते, तर त्यांचे भारतीय शास्त्रीय संगीतातही मोठे योगदान आहे. त्यांनी हिंदुस्तानी शास्त्रीय संगीतात अनेक नवे प्रयोग केले. सितार आणि तबला या वाद्यांच्या निर्मितीत त्यांचा महत्वाचा सहभाग होता. त्यांनी सूफ़ी तत्वज्ञानाने प्रेरित ‘कव्वाली’, ‘मुकरियाँ’, ‘पहेलीयाँ’ आदी काव्यप्रकारांत विपुल लेखन केले आहे. ‘जिहाल-ए-मिस्की…’, ‘छाप तिलक…’ यांसारख्या त्यांच्या कव्वाली आजही लोकप्रिय आहेत. त्यांना कव्वाली काव्यासह उर्दू भाषा आणि साहित्याचे जनक म्हटले जाते.
उर्दुच्या आरंभिक साहित्यकारांमध्ये मसूद साद सलमान, बाबा फरीद शकरगंज, अमीर ख़ुसरों प्रमाणेच गेसूदराज, फक़रुद्दीन निज़ामी यांचे महत्वाचे योगदान आहे. गेसूदराज यांनी पैगंबर मुहम्मद सअव यांच्या विषयी लिहिलेले ‘मेराज़-अल-माशिकीनी’ हे दक़नी उर्दूतील पहिले पुस्तक आहे, त्या अर्थाने गेसूदराज दक़नी उर्दूत लिहिणारे पहिले साहित्यीक ठरतात. याच काळात लिहिली गेलेली कवी फक़रुद्दीन निज़ामी यांची उर्दु मसनवी ‘कदमराव पद्मराव’ दक़नी उर्दूतील पहिली लिखित मसनवी होय.
अल्लाउद्दीन ख़िलजी आपल्या सैन्य आणि लवाजम्यासह दक्षिणेत उतरला तेव्हा त्यांच्यासह दिल्लीतील ही नवी भाषाही दक्षिणेत पोहोचली. १३२७ साली दिल्लीचा सुलतान मुहम्मद तुग़लक याने आपली राजधानी दक़न प्रांतातील दौलताबाद येथे स्थलांतरित केली. मात्र स्थलांतराचा हेतू साध्य होत नसल्याचे लक्षात आल्यानंतर त्याने ती पुन्हा दिल्ली येथे हलवली. परंतु बऱ्याच जणांनी परत जाणे टाळले. राजकीयदृष्ट्या जरी हे स्थलांतर अयशस्वी ठरले असले तरीही उर्दू भाषेच्या विकासाच्या दृष्टीने ती एक अत्यंत उपकारक अशी घटना ठरली. कालांतराने एक साहित्यीक भाषा म्हणून उर्दू भाषेच्या विकासाचा दक्षिण भारतात प्रारंभ झालेला दिसतो.
मुहम्मद तुघलकाच्या कारकिर्दीत दिल्ली सल्तनतीचे पतन सुरू झाले आणि १३४७ मध्ये हसन गंगू उर्फ हसन बहमनी याने गुलबर्गा येथे दिल्लीपासून स्वतंत्र अशा पहिल्या मुस्लिम राजवटीची स्थापना केली. या राजवटीने राजभाषा म्हणून त्या नव्या भाषेचा स्वीकार केला. त्या काळी दिल्ली आणि परिसरात ती विकसित झाली. जरी ती नागरी लिपीत लिहिली जात असली, तरी तीची भाषा मात्र उर्दूच होती.
पंधराव्या शतकाच्या अखेरीस बहमनी सल्तनतीतून उदयास आलेल्या पाच राज्यांपैकी विजापूरची ‘आदिलशाही’ आणि गोवळकोंड्याची ‘कुतुबशाही’ या दोन राजवटींनी फारसी भाषेच्या अभिजनवादी परंपरेच्या विरुद्ध जाऊन उर्दू भाषा आणि साहित्याला प्रोत्साहन दिले. त्यामुळे एकीकडे सूफी काव्य परंपरा विकसित झाली तर दुसरीकडे करबलाची शोकांतिका मांडणाऱ्या ‘मरसिया’ आणि इतर धार्मिक काव्यप्रकारांचा विकास झाला. बहमनी सल्तनतीला उतरती कळा लागल्यानंतर १४९० साली विजापूरचा सुभेदार ‘युसूफ आदिलशाह’ याने आदिलशाहीची स्थापना केली. या राजवटीतील चौथा सुलतान ‘इब्राहिम आदिलशाही दुसरा’ याचा भारतीय रागदारी संबधित ग्रंथ ‘किताब-ए-नवरस’ हा भारतीय संगीताचा अमुल्य ठेवा आहे. या ग्रंथात सुरुवातीलाच कवीने सरस्वती, गणपती आदी हिंदू देवतांविषयी विशेष भक्तीभाव व्यक्त केलेला आहे.
आदिलशाहीच्या अखेरच्या काळातला आठवा सुलतान अली आदिल शाह द्वितीय याच्या दरबारातील कवी मुहम्मद नुसरत याचे दकनी साहित्यात विशेष महत्त्व आहे. फारसीच्या ‘शाहनामा’वरून प्रेरित होऊन त्याने लिहिलेलं ‘अलीनामा’ हे दकनी उर्दूतील पहिलं कसिदा काव्य मानलं जातं. त्याआधीच्या मुहम्मद आदिलशाहच्या काळात रूस्तमी, मलिक खुशनूद, अब्दुल मुक़िमी आणि हाशिमी हे कवी विजापूरच्या दरबारात प्रसिद्ध होते. दुसरीकडे, गोवळकोंड्याची कुतुबशाही सल्तनतही साहित्यदृष्ट्या अत्यंत समृद्ध होती. १५१८ साली कुली कुतुब-उल-मुल्कने स्वतंत्र कुतुबशाही राज्य स्थापन केलं. त्याचा वारसदार इब्राहिम कुली कुतुब शाह हा फारसी, अरबी आणि तेलुगू भाषांचा विद्वान आणि स्वतःही कवी होता. त्याच्या दरबारात अनेक कवींना आश्रय होता. याच काळात दक्षिणेत हिंदू-मुस्लीम सांस्कृतिक समन्वयाची पायाभरणी झाली.
सुलतान मुहम्मद कुली कुतुब शाह याचा कार्यकाळ कुतुबशाहीचा सुवर्णकाळ मानला जातो. त्याने आजच्या हैदराबाद शहराची म्हणजेच तत्कालीन भागनगरची स्थापना केली आणि चारमिनारसारख्या ऐतिहासिक वास्तूचे निर्माण करवले. तो स्वतः कवी होता आणि उर्दू साहित्यातला पहिला ‘साहब-ए-दीवाण’ म्हणून ओळखला जातो. त्याच्या कवितांमध्ये दकन प्रांतातील हिंदू-मुस्लीम सांस्कृतिक एकात्मतेचं सुंदर प्रतिबिंब दिसून येतं. त्याचा उत्तराधिकारी अब्दुल्ला कुतुब शाह हाही एक गुणी कवी आणि साहित्यप्रेमी होता. बहुभाषिक सुलतान म्हणून त्याने काव्य व संगीत या दोन्ही क्षेत्रात मोलाचं योगदान दिलं. त्याच्या दरबारातील कवी आणि त्याकाळातील ‘बुऱ्हान-ए-कातिअ’ हा काव्यकोश यांमुळे त्याची कारकीर्द उर्दू पद्यसाहित्याच्या इतिहासात विशेष महत्त्वाची ठरते.
१७ व्या शतकाच्या अखेरीस उर्दू दक्षिणेत पोहोचण्याआधीच गुजरातमध्ये सूफी संप्रदायाचा मोठा विस्तार झाला होता. त्या काळात सूफी संत मोठ्या प्रमाणात साहित्यनिर्मिती करत होते. सामान्य लोकांना आपला संदेश समजावा म्हणून ते अरबी-फारसीबरोबरच स्थानिक बोलीभाषेचाही वापर करत. या मिश्र भाषेला त्यांनी ‘गुज़री’ असे नाव दिले, जी दकनीप्रमाणेच उर्दूचे एक रूप मानली जाते. शेख अहमद खट्टू आणि बुरहानुद्दीन कुत्ब-ए-आलम बुख़ारी यांच्या लेखनापासून गुज़री उर्दू साहित्याचा प्रारंभ मानला जातो. त्यानंतर शेख बहाउद्दीन बाजन, शाह अलीजीव गायधनी, मियाँ खुब मुहम्मद चिश्ती, काज़ी महमूद दरियारी आणि शेख मुहम्मद अमीन हे या परंपरेतील महत्त्वाचे कवी ठरतात. विशेषतः काज़ी महमूद दरियारी यांनी लोकप्रिय केलेला ‘जक़री’ हा काव्यप्रकार गुज़री उर्दू काव्याची खासियत मानली जाते. याच परंपरेत पुढे वली दकनी यांनी योगदान दिले आहे.
वली मुहम्मद वल’, ज्यांना ‘वली’, ‘वली दक़नी’, ‘वली औरंगाबादी’ आणि ‘वली गुजराती’ या नावांनी ओळखले जाते, हे ‘उर्दूचे आद्य कवी’ होते. जन्मस्थानाविषयी मतैक्य नसले तरी त्यांचा जन्म १६६७ साली झाल्याचे सर्वमान्य आहे. ते सूफ़ी तत्वज्ञानाच्या प्रभावाखाली सदैव भ्रमंतीवर असतं. वली हे उर्दूचे पहिले कवी होते ज्यांनी ग़ज़ल, मसनवी, कसीदा, मुखम्मस आदी सर्व काव्यप्रकारांमध्ये लेखन केले. १७०० साली ते दिल्लीला गेले. तिथल्या फारसी कवींना त्यांनी उर्दू ग़ज़लेची ओळख करुन दिली. त्यांच्या काव्यात प्रेम, भक्तिरस आणि सूफ़ी तत्वज्ञानाचा गहिरा प्रभाव आहे. त्यांचा काव्याचा ‘कुल्लियात-ए-वली’ हा संग्रह उर्दू साहित्यातील पहिला समग्र काव्यसंग्रह ‘कुल्लियात’ आहे. त्यांच्या समकालीन कवींमध्ये सिराजुद्दीन ‘सिराज’ आणि क़ाज़ी महमूद ‘बहरी’ यांचा समावेश होतो. सिराज यांची मसनवी ‘बोसतान-ए-ख़याल’, आणि ‘बहरी’ यांची सूफ़ी तत्वज्ञानावर आधारित मसनवी ‘मनलगन’ प्रसिद्ध आहे.
दिल्लीतील काव्यक्षेत्रात १७ व्या शतकाच्या सुरुवातीपासून उर्दू कवींचा प्रभाव होता, ज्यात अफ़ज़ल पानिपती, जाफ़र ज़टल्ली, अटल, आणि रोशन अली सहारनपुरी यांचा समावेश आहे. लखनौ विद्यापीठातील भाषातज्ज्ञ दिवंगत मसूद हसन रिज़वी यांच्या संग्रहात तत्कालीन उर्दू मरसियांचे एक हस्तलिखित आहे, ज्याच्या भाषेला त्यांनी ‘रेख़्ता’ संबोधले आहे.
१८ व्या शतकाच्या आरंभापासून प्रत्यक्ष उर्दू भाषेत लेखन प्रस्थापित झालेले दिसते. १७१९ च्या सुमारास बादशाह मुहम्मद शाह याच्या कारकिर्दीत उर्दू साहित्याच्या पहिल्या टप्प्याची सुरुवात झाली, आणि जनसामान्यांची भाषा असलेली उर्दू हळूहळू साहित्यिक व काव्यभाषा बनू लागली. हा काळ दिल्लीसाठी राजकीय अराजकतेचा होता. कला आणि साहित्यावरही निराशेचे सावट होते. त्यातून अनेक छोटी साहित्यिक केंद्रे उदयास आली, त्यात अवध संस्थान विशेष होते. नवाब शुज़ाउद्दौलाला ते सांस्कृतिकदृष्ट्या विकसित करायचे होते. त्याने फैज़ाबाद शहरात कवींना आमंत्रित केले. दिल्लीतील अनेक कवी अवध संस्थानात दाखल झाले. त्यात मिर्ज़ा मुहम्मद रफी ‘सौदा’ पहिले होते. त्यानी क़सीद्यांसह मरसिया ही लिहिल्या. त्यांना उर्दूतील ‘महाकवी’ म्हटले जाते.
दिल्लीत दाखल झालेले दुसरे महत्वाचे कवी मीर मुहम्मद तक़ी ‘मीर’ होते. त्यांच्या उर्दुकाव्याचे सहा संग्रह प्रसिद्ध आहेत. त्याचे फारसी आत्मचरित्र ‘ज़िक्र-ए-मीर’चा उर्दू अनुवादही विशेष उल्लेखनीय आहे. ‘तुम्बीहुल-ख़याल’ या मसनवीत त्यांनी काव्यतत्त्वांवर चर्चा केली आहे. ‘मुसल्लस’, ‘रुबाई’ आणि ‘मुखम्मस’ या अनुक्रमे तीन, चार व पाच ओळी असलेल्या काव्यारचना प्रकारात त्यांनी नवोन्मेषशाली काव्यनिर्मिती केली. मीर यांना त्याकाळातील सर्वश्रेष्ठ कवी म्हणून मान्यता आहे.
त्या काळात अनेक गैरमुस्लीम हिंदू कवींनीही उर्दू साहित्यात मोलाचे योगदान दिले. राय सरबसुख ‘दिवाना’, आनन्दराम ‘मुख़लिस’, टेकचंद ‘बहार’, खुबचंद ‘ज़का’, बिन्द्राबन ‘राक़िम’, भिखारीलाल ‘अज़ीज़’, महराब राम ‘ताबाँ’, बालमुकुन्द ‘हुज़ूर’, मंगलसेन ‘उल्फ़त’, सियालकोटीमल ‘वारुस्त’, बिन्द्रावनलाल ‘ख़ुशगो’ हे सर्व कवी उर्दूसह फारसीचेही उत्तम जाणकार होते. त्यांचे उर्दू भाषेतील साहित्यिक योगदान धार्मिकतेच्या पलीकडचे होते. १९ व्या शतकाच्या सुरुवातीलाच लखनौ शहराने एक नवी सांस्कृतिक ओळख निर्माण केली होती. हसन, कलन्दर, जुरअत, इन्शा, आणि हमदानी यांच्या काव्याला त्यामध्ये महत्त्वाचे स्थान आहे. मीर ‘हसन’ हे कवी मसनवी लेखनासाठी प्रसिद्ध आहेत. शेख कलन्दर यांच्या काव्यात श्रृंगाररसासोबत अश्लिलतेची छटा दिसते, जी नंतरच्या काळात लखनौ शैलीची विशेषता बनली.
इन्शा यांची ‘रानी केतकी की कहानी’ उर्दूतील पहिली हिंदी कथा मानली जाते. त्यांच्या ज्यांना स्त्रीवादी म्हणता येईल अशा काही काव्यरचना ही प्रसिद्ध आहेत. ज्यांची काव्यशैली ‘रेख़्ती’ म्हणून ओळखली जाते. स्त्रियांच्या जीवनाशी संबंधित सामाजिक वास्तविकतेचे प्रतिविंब असलेल्या या काव्यशैलीला ऐतिहासिक महत्व आहे. रेख़्ती काव्यासाठी इन्शाने स्वतःसह ‘रंगीन’ या आपल्या कविमित्राच्या नावाचाही उल्लेख केला आहे.
इन्शाचाच समकालीन शहजादा सुलेमान शिकोहच्या दरबारी कवी असलेले गुलाम हमदानी ‘मुसहफ़ी’ यांच्या काव्यात मीर यांच्या काव्यातील वेदना, सौदा यांची काव्यशैली आणि सोज़ यांच्या काव्यातील साधेपणा प्रकर्षाने जाणवतो. मुसहफ़ीच्या काव्यातच उर्दूचा भाषा म्हणून पहिला उल्लेख आढळतो. त्यानंतरच्या ‘आतिश’ आणि ‘नासिख़’ या दोन कवींचा उर्दू ग़ज़लेच्या क्षेत्रात अत्यंत महत्वाचा सहभाग होता. आतिश आपले गुरु मुसहफ़ी आणि दिल्ली काव्यशैलीच्या प्रभावाखाली काव्यलेखन करत होते, तर नासिख़ यांनी स्वतंत्र काव्यशैलीत लेखन केले आहे, जी नंतर लखनौ काव्यशैली म्हणून प्रसिद्ध झाली. नासिख हे कुण्या मोठ्या कवींचे शिष्य नव्हते, त्यामुळे त्यांच्या काव्यात एक प्रभावविरहीत स्वयंपूर्णता दिसून येते. शेख इमाम बख़्श ‘नासिख़’ यांचे काव्यलेखन उर्दू ग़ज़लेच्या नव्या युगाची सुरुवात मानली जाते.
अवध संस्थानात १८ व्या शतकात एक महत्त्वाचा काव्यप्रकार म्हणून ‘मरसिया’ अर्थात शोकगीतांचा उल्लेख करावा लागतो. मरसिया काव्य मृत्यूच्या स्मृतींवर आधारित असते. विशेषत्वाने अवध संस्थानातील मरसियांना ऐतिहासिक संदर्भ आहे. अवध नवाब शिया पंथीय होते. त्यामुळे इमाम हसन आणि हुसैन यांच्या मृत्यूच्या शोकात करबला युध्दावेळी घडलेल्या प्रसंगांची हृदयद्रावक वर्णने तत्कालीन मरसिया काव्याचे महत्वाचे वैशिष्ट्य आहे. मरसिया लेखनाची सुरूवात तशी दक्षिणेत झाली होती, परंतु सुरुवातीच्या काळात तेथेही दिल्ली प्रमाणेच साहित्यिक कल्पकतेचा अभाव होता. मिर्झा सौदा यांच्या विपुल मरसिया लेखनाने या काव्यप्रकाराला साहित्यिक महत्त्व प्राप्त करून दिले. लखनौ येथील उर्दू काव्यात त्याच्या स्पष्ट पाऊलखुणा आढळतात.
दिल्ली आणि लखनौच्या काव्यशैलींपेक्षा भिन्न असलेल्या तत्कालीन अकबराबाद- ‘आग्रा’ येथील वली मुहम्मद ‘नज़ीर’ यांच्या काव्यशैलीला विशेष महत्त्व आहे. त्यांचा जन्म दिल्लीमध्ये झाला असला तरी ते आयुष्यभर अकबराबादेतच वास्तव्यास होते. अकबराबादेतील वैष्णव भक्तिकाव्य आणि राधा-कृष्णाच्या प्रेमाचा प्रभाव त्यांच्या काव्यावर स्पष्टपणे दिसून येतो. त्यांच्या काव्याची भाषा बोलीभाषेसारखी आहे, ज्यात ब्रजभाषा आणि खडीबोलीचा प्रभाव आढळतो. समाजातील शोषित आणि वंचित वर्गासाठी त्यांची घनिष्ठ सहानुभूती होती. त्यांच्या काव्यात दारिद्र्य, वर्गभिन्नता आणि मानवतेची आवश्यकता यावर प्रगल्भ चिंतन मांडले गेले आहे आणि त्यात मानवी जीवन आणि काव्याचा अन्वयार्थ लावण्याचा आधुनिक दृष्टिकोन ही आढळतो, जे त्यांच्या काव्याचे शक्तीस्थळ आहे.
१९व्या शतकात दिल्लीतील उर्दू काव्यलेखनास पुन्हा एकदा बहर आला ज्याची सुरुवात ‘शाह नसीर’ यांच्या काव्यलेखनापासून समजली जाते. मुहम्मद इब्राहीम ‘ज़ौक’ यांचे स्थान ही त्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आहे. ज़ौक हे काही काळ शाह नसीर यांचे शिष्य होते. केवळ २० वर्षांच्या वयात ख्यातकिर्त झालेल्या ज़ौक यांना पुढे मुग़ल शहजादा बहादुर शाह ‘ज़फर’ यांनी आपले काव्यागुरू म्हणून स्वीकारले होते आणि बादशाह झाल्यावर राजकवी पदी नेमून त्यांना ‘मलिकुश्शुअरा’ व ‘ख़ाक़ानी-ए-हिन्द’ या उपाधींनी गौरवान्वित केले होते.
‘ज़ौक’ यांच्या मृत्यूनंतर १८५४ मध्ये मुग़ल बादशाह ‘बहादूरशाह ज़फ़र’ यांच्या दरबारात काव्यगुरू म्हणून मिर्ज़ा असदुल्ला खाँ ‘ग़ालिब’ यांची नियुक्ती झाली. ग़ालिब हे मुग़ल साम्राज्याच्या ऱ्हासाच्या काळातील एक प्रमुख कवी आणि फारसी भाषेचे गाढे अभ्यासक होते. त्यांचा काव्यसंग्रह ‘दीवान-ए-ग़ालिब’ व समग्र काव्यसंग्रह ‘कुल्लियात-ए-ग़ालिब’ प्रसिद्ध आहे. ‘ग़ालिब’ यांच्या साहित्याचा एक महत्त्वाचा विशेष म्हणजे त्यांचे पत्रलेखन. ‘मुक़ातीब-ए-ग़ालिब’ आणि ‘खुतुत-ए-ग़ालिब’ यासारख्या पत्रसंग्रहांमुळे ग़ालिब यांचा साहित्यिक वारसा ऐतिहासिकदृष्ट्याही महत्वाचा आहे.
मुगल सत्ता शेवटच्या घटका मोजत होती तेंव्हा मुगल बादशाह बहादुर शाह ‘ज़फर’ काव्याच्या क्षेत्रातील एक यशस्वी कवी म्हणून उदयाला येत होते. शाह नसीर, ज़ौक़ आणि ग़ालिब या तिघांचेही ते शिष्य होते. त्यांचे चार काव्यसंग्रह ‘दीवान’ व समग्र काव्याचा संग्रह ‘कुल्लियात-ए-ज़फ़र’ प्रसिद्ध आहेत. दिल्लीतील उर्दूच्या पुनर्जागरणाच्या काळातील ज़ौक़, ग़ालिब व ज़फ़र प्रमाणेच महत्वाचे कवी म्हणून मोमिन खाँ ‘मोमिन’ यांच्या नावाचा उल्लेख करावा लागतो. काश्मिरी वंशाचे, पेशाने हकीम असलेले फारसी काव्याचे तज्ज्ञ मोमिन यांनी गज़लेसह मसनवी आणि कसिदा हे काव्यप्रकार हाताळले. त्यांच्या समग्र काव्यसंग्रह ‘कुल्लियात-ए-मोमिन’ मध्ये सहा मसनविंचा समावेश आहे. त्यांनी लिहिलेल्या नऊ कसिद्यांमध्ये सात कसिदे हे धार्मिक ‘नात’ या स्वरुपाचे आहेत, ज्यात पैगंबर मुहम्मद यांची प्रशंसा केलेली असते.
१९व्या शतकाच्या सुरुवातीस कंपनी सरकारने कलकत्त्याला नवे सत्ताकेंद्र केले आणि देशातील धार्मिक स्थितीचा अभ्यास करून नवे शिक्षण धोरण आखले. फारसी भाषेचा राजकीय दर्जा संपवून त्यांनी उर्दू भाषेवर लक्ष केंद्रीत केले. प्रत्यक्षात याची सुरुवात १८व्या शतकातच झाली होती. १७१५ मध्ये जोशुआ केटलर यांनी हिंदुस्तानी व्याकरणाचे पुस्तक लिहिले, तर १७४८ मध्ये फादर बेंजामिन शुल्झ यांनी बायबलचा उर्दू अनुवाद केला. १७३१ च्या सुमारास मिर्झा रफी ‘सौदा’ यांच्या ‘दह मजलिस’ पासून उर्दू गद्याचा आरंभ मानला जातो. त्याच वेळी शाह वलीउल्लाह, शाह रफीउद्दीन, आणि शाह अब्दुल कादिर यांनी कुराण व धार्मिक ग्रंथांचे उर्दू अनुवाद लिहिले. इंशा यांनी १८०३ मध्ये ‘रानी केतकी की कहानी’ आणि १८०७ मध्ये ‘दर्या-ए-लताफ़त’ लिहून उर्दू गद्य लेखनाला नवे वळण दिले.
१८०० साली डॉक्टर जॉन गिलक्रिस्ट फोर्ट विल्यम कॉलेजमध्ये भाषाप्राध्यापक झाले आणि त्यांनी उर्दू गद्य लेखनाला जोरदार प्रोत्साहन दिले. त्यांनी प्रकाशन संस्थाही सुरू केली. त्यांच्या आधीच १७९६ साली त्यांनी हिंदुस्थानी भाषेचे व्याकरण लिहिले होते. त्याकाळी एस. डब्ल्यू. फेलुन यांच्यासारखे युरोपीय लेखकही उर्दू लेखनात सक्रिय होते. फेलुन यांनी उर्दू कवींचे तजकिरे आणि शब्दकोश प्रकाशित केला. इंग्रजी शिक्षणाच्या वाढीमुळे १८४२ मध्ये दिल्ली कॉलेजमध्ये ‘व्हर्नाक्युलर ट्रान्सलेशन सोसायटी’ स्थापन झाली. यामुळे अनेक महत्त्वाचे ग्रंथ उर्दूत अनुवादित झाले. पुढे मास्टर रामचंद्र यांच्या नेतृत्वाखाली दिल्ली कॉलेजमध्ये विज्ञानविषयक उर्दू साहित्य प्रकाशित होऊ लागले. या सर्व घडामोडींमुळे उर्दू गद्य साहित्याला नवा आत्मा आणि व्यापक आधार मिळाला.
१८५७ च्या उठावानंतर उर्दू साहित्यात नवजागरणाचा काळ सुरू झाला. व्हर्नाक्युलर ट्रान्सलेशन सोसायटी लाहोरला हलली आणि डॉरिंगटन कॉलेज हे नव्या साहित्यिक केंद्रात रूपांतरित झाले. ‘अंजुमन-ए-पंजाब’ यासारख्या संस्थांनी उर्दू साहित्य संवर्धनासाठी मोठे योगदान दिले. मौलाना मुहम्मद हुसेन आझाद यांनी नवकाव्याची मुहूर्तमेढ रोवली. त्याच काळात शेफ़्ता, अमीर, दाग़, मीना आणि जलाल या कवींचे लेखन प्रभावी ठरले. इंग्रजी साहित्याने प्रेरित होऊन हाली, आझाद, नझीर अहमद आणि शिबली नोमानी यांनी सर सय्यद अहमद यांच्या नेतृत्वाखाली आधुनिक उर्दू साहित्याला दिशा दिली. दाग़ यांनी उर्दू समीक्षेचे बीज पेरले. त्यांचे चार काव्यसंग्रह प्रसिद्ध आहेत. याच काळात सरशार, शरर आणि मिर्झा रुसवा यांसारख्या लेखकांनी कादंबरी साहित्यात मोलाची भर घातली. इक़बाल, चकबस्त आणि प्रेमचंद यांच्या लेखनातून राष्ट्रवादाचे स्वर उमटले.
विसाव्या शतकाच्या प्रारंभी उर्दू काव्यावर इंग्रजी-युरोपीय कवितेचा प्रभाव जाणवू लागला. अजमतुल्ला खान हे ‘सूनिते’ काव्यप्रकाराचे अग्रणी कवी मानले जातात. त्यांच्यासह अख़्तर शीरानी, नून मीम रशीद, मेहरलाल सोनी, ज़िया फ़तेहाबादी, सलाम मच्छलीशहरी आणि वजीर आग़ा यांचे योगदान उल्लेखनीय आहे. सर सय्यद अहमद हे अलीगढ चळवळीचे प्रमुख नेतृत्व होते. त्यांनी पत्रकारिता, इतिहास, धर्म आणि शिक्षण क्षेत्रात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. या चळवळीमुळे एक नवा साहित्यिक गट तयार झाला. शिबली नोमानी यांनी ‘सीरत-उन-नबी’ पासून ‘सफरनामा’पर्यंत अनेक साहित्यिक ग्रंथ लिहिले. जकाउल्ला देहलवी यांची ‘तारिख़-ए-हिंदुस्तान’ ही १४ खंडांची ऐतिहासिक मालिका प्रसिद्ध आहे. अल्ताफ हुसेन हाली यांनी ‘मुसद्दस-ए-हाली’, ‘हयात-ए-सादी’ आणि ‘यादगार-ए-ग़ालिब’सारख्या गद्यरचनांमधून साहित्याला नवी दृष्टी दिली. त्यांच्या ‘मुकद्दमा-ए-शायर-ओ-शायरी’ने उर्दू समीक्षेचा पाया घातला.
उर्दू गद्य साहित्यात कादंबरी लेखनाची सुरुवात मौलाना नज़ीर अहमद देहलवी यांच्या ‘मिरात-उल-ऊरुस’ (१८६९) या कादंबरीपासून समजली जाते. त्यानंतर ‘मुहम्मद हुसेन आझाद’, ‘मौलवी करीमुद्दीन’, रतन नाथ धर ‘सरशार’ आणि अब्दुल हलीम ‘शरर’ यांसारख्या लेखकांनी उर्दू कादंबरीला आकार दिला. मिर्झा हादी रुसवा यांची कादंबरी ‘उमराव जान अदा’ १९व्या शतकातील महत्त्वपूर्ण कादंबरी ठरली. एकोणीसाव्या शतकाच्या शेवटी-शेवटी उर्दू कादंबरीने समकालीन समस्यांना हात घालायला सुरुवात केली. प्रेमचंद यांची कादंबरी यात अग्रणी होती. त्यांनी सामाजिक, धार्मिक आणि आर्थिक विषयांवर लेखन केले. याशिवाय उर्दूतील लघुकथा लेखनाच्या क्षेत्रातही प्रेमचंद यांचा महत्त्वपूर्ण वाटा आहे. त्यांच्या समकालीन लेखकांमध्ये पंडित सुदर्शन, मुहम्मद मेहदी तस्कीन आणि काझी अब्दुल ग़फ्फार, नियाज़ फत्तेहपुरी, अली अब्बास हुसैनी, राजा महमुदाबाद यांचा समावेश होतो. त्याकाळी उर्दू काव्यासह गद्य लेखनातही नवे परिवर्तन आले होते. ‘ज़ोश’, ‘फ़िराक़’, ‘फ़ैज़’, ‘मज़ाज़’ इत्यादी कवी विविध समस्यांधारित काव्यलेखन करत होते.
२० व्या शतकाच्या सुरुवातीला उर्दू कादंबऱ्यांच्या विषयाचा शहरी असलेला केंद्रबिंदू नकळत ग्रामीण समाज जीवनाच्या केंद्रस्थानी येत गेला. ज्यात १९३० नंतर स्वत्वाची ओळख आणि विस्थापनासह स्थलांतराचे प्रश्न साहित्यकृतींमधून मांडले जाऊ लागले. यावर सज्जाद ज़हीर यांच्या ‘प्रगतीशील लेखन चळवळी’चा प्रभाव होता. १९३२ साली ‘अंगारे’ या लघुकथा संग्रहाने पुरोगामी लेखक चळवळीला चालना दिली. चळवळीमुळे उर्दू कादंबरीलाही एक नविन दिशा मिळाली. ज्यात कृश्न चंदर, इस्मत चुगताई, ख़दिजा मस्तूर, अस्रार अहमद नारवी ‘इब्न-ए-सफ़ी’, कुर्रतुल ऐन हैदर, शौकत सिद्दीकी आदींचे योगदान महत्वाचे होते. शिवाय मखदूम मोहिउद्दिन, फ़ैज़ अहमद फ़ैज़, अली सरदार जाफ़री, अहमद नदीम कासमी आणि कैफ़ी आज़मी ह्या प्रगतीशील लेखक चळवळीतील महत्वाच्या साहित्यिकांचे योगदान सामाजिक आणि सांस्कृतिक परिवर्तनाला वाट मोकळी करून देणारे ठरले. रहमान अब्बास यांच्या लेखनाच्या माध्यमातून ती परंपरा आजही सुरू आहे.
दरम्यान पाश्चात्य प्रभावामुळे ‘लघुकथा’ उर्दू साहित्यातील एक प्रमुख गद्य प्रकार म्हणून पुढे आली. सआदत हसन मंटो, इस्मत चुगताई, कृश्न चंदर आणि राजिंदर सिंग बेदी हे उर्दू लघुकथा साहित्याचे प्रमुख लेखक मानले जातात. मन्टो यांनी फाळणीच्या वेदनांचे चित्रण केले, इस्मत चुगताई यांनी स्त्रीविमर्शावर लिहिले, कृश्न चंदर यांनी मानवी जीवनावर वास्तववादी भाष्य केले आणि राजिंदर सिंग बेदी यांनी फाळणीच्या कथा लिहिल्या. पुढे शंभर वर्षांच्या इतिहासात उर्दू लघुकथा अनेक टप्प्यांतून गेली, ज्यात ‘रोमँटिक’, ‘प्रगतीशील’, ‘आधुनिकतावादी’ आणि ‘वर्तमान लघुकथा’ लेखन समाविष्ट आहे.
२०व्या शतकातील साहित्यनिर्मितीवर विविध विचारधारांचा प्रभाव आढळतो. इंग्रजी साहित्य आणि शिक्षणाच्या प्रभावामुळे ‘छायावादी’ कवितेला चालना मिळाली. लोकशाही आणि राष्ट्रवादाच्या भावनेने प्रगतीशील साहित्य चळवळीला जन्म दिला. दरम्यान, मार्क्सवाद आणि फ्रॉइडच्या मानसशास्त्रीय विचारांनीही लेखकांची विभागणी केली. काव्यात छंदमुक्त काव्यलेखनास सुरुवात झाली. हे सगळे प्रयोग अजूनही खोलवर रुजलेले नाहीत. मात्र तरीही आधुनिक साहित्यावर आणि पर्यायाने उर्दू साहित्यावरही त्याचा मोठा प्रभाव पडतो आहे.
१८ व्या शतकाच्या सुरुवातीलाच भारतात उर्दू वृत्तपत्रे सुरू झाली होती. मौलवी मुहम्मद बाकर १८२० पासून शाही छापखान्याचे मुखपत्र ‘सिराज-उल-उर्दू’ दिल्लीहून प्रकाशित करत होते. १८३७ मध्ये त्यांनी ‘देहली उर्दू अखबाऱ’ सुरू केले. सत्तावनच्या उठावाच्या समर्थनार्थ यांचे नाव बदलून ‘अखबाऱ-उल-ज़फ़र’ करण्यात आले होते. दरम्यान १८५० मध्ये लाहोर येथून ‘कोहिनूर’ आणि १८५८ मध्ये तत्कालीन बंबई येथून ‘गाईड’ सुरू झाले होते. शिवाय पुण्यातून प्रसिद्ध होणारे पहिले उर्दू मासिक ‘जम-ए-जम'(१८२२), हैदराबाद येथील ‘रिसाला-ए-निज़ाम'(१८३६), तत्कालिन कलकत्ता येथून प्रकाशित होणारे ‘सैय्यद-उल-अख़बार’ (१८४६) आणि ‘पयाम-ए-आज़ादी'(१८५७) आणि लखनौस्थित ‘अवध अख़बार'(१८५८) यांच्या नावांचा उल्लेख करणे अगत्याचे ठरते. मात्र तत्पूर्वी १७९४ पासूनच टिपू सुलतान यांच्या मैसुर संस्थानात सैनिकांसाठी ‘फ़ौजी अख़बार’ नियमितपणे छापले जात होते.
१८५७ च्या उठावानंतर बदलत्या परिस्थितीत उत्तरेतील विविध शहरांमध्ये ‘इन्स्टिट्यूट गैझेट’, ‘तहजीब-उल-अख़लाक’, ‘अवध पंच’, ‘क़शफ़ल’ यासारखी नवनवीन वृत्तपत्रे सुरू झाली. मास्टर रामचंद्र यांनी १८५२ मध्ये ‘फ़वायद-उल-नजरीन’ आणि ‘किरण-उस-सदायी’ ही विज्ञान विषयक नियतकालिकं सुरू केली. १८७७ मध्ये ‘अंजुमन इस्लामिया’चे ‘नुसरत-उल-अख़बार’, ‘नुसरत-उल-इस्लाम’ व ‘मिहिर-ए-दारख़्शन’ सुरू झाले. पुढे १८८१ मध्ये ‘दार-उल-सल्तनत’ आणि १८८७ मध्ये खास महिलांसाठीचे पहिले उर्दु मासिक ‘अख़बार-उल-निसा’चे प्रकाशन सुरु झाले होते.
२०व्या शतकाच्या सुरुवातीच्या बदलत्या राजकीय परिस्थितीत उर्दू वृत्तपत्रांनी अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावली. त्यादृष्टीने ‘पैसा अकबर’, ‘अवध अकबर’, ‘सुल्ह-ए-कुल’, ‘जमींदार’, ‘हिन्दुस्तानी’, ‘हमदर्द’, ‘देश’, ‘दीपक’, ‘उर्दू-ए-मोअल्ला’, ‘मुस्लिम गॅजेट’, ‘हम-दम’, ‘मदीना’, ‘स्वराज’ या वृत्तपत्रांचा विशेषत्वाने उल्लेख आवश्यक ठरतो. स्वातंत्र्यपूर्व काळात अनेक राजकीय नेत्यांची स्वतःची उर्दू वृत्तपत्रे निघत होती, पैकी मौलाना अबुल कलाम आझाद यांच्या ‘अल-हिलाल’ला विशेष महत्त्व होते. शिवाय लाला लजपतराय यांचे लाहोर येथून प्रसिद्ध होणारे ‘वंदे मातरम’ आणि पंडित नेहरूंचे ‘कौमी आवाज’ ही उर्दू वृत्तपत्रेही प्रसिद्ध होती. गांधीजींच्या धोरणांना पाठिंबा देण्यासाठी महाशय कृष्ण यांनी १९१९ साली लाहोरहून उर्दू दैनिक ‘प्रताप’ सुरू केले होते. दरम्यानच १९२३ मध्ये स्वामी श्रद्धानंद यांचे ‘तेज’ आणि लाहोरहून आर्य समाजाचे ‘मिलाप’ ही उर्दू दैनिकेही सुरू झाली होती आणि फाळणीनंतर लगेचच जमात-ए-इस्लामी हिन्दचे उर्दू द्वि-साप्ताहिक ‘दावत’ सुरू झाले होते.
स्वातंत्र्योत्तर काळात १९५१ मध्ये स्वातंत्र्यसेनानी मौलाना अब्दुल वहिद सिद्दिकीं यांनी ‘नई दुनिया’ सुरू केले, ज्याचे १९७३ मध्ये शाहिद सिद्दिकी या त्यांच्या मुलाने त्याचे पुनरुज्जीवन केले. त्याशिवाय त्यांनी १९७१ मध्ये ‘वकियत’ हे पाक्षिकही सुरू केले. स्वातंत्र्यानंतर भारतात आलेल्या महाशय कृष्ण यांच्या मुलांनी १९५२ साली ‘दैनिक प्रताप’ पुन्हा सुरु केले जे पुढे १९९४ पर्यंत चालू होते. अलीकडे माध्यमसमूहांनी अनेक उर्दू वृत्तपत्रे ताब्यात घेऊन वृत्तवाहिन्या सुरू केल्या आहेत. हैदराबाद येथून प्रकाशित होणाऱ्या देशातील सर्वाधिक खप असलेल्या ‘मुन्सिफ़’ या वृत्तपत्रसंस्थेनेही २०११ साली स्वतःची वृत्तवाहिनी सुरु केली आहे. दृकश्राव्य माध्यमांच्या क्रांतीमुळे अलिकडे बहुतांश मोठ्या उर्दू वृत्तपत्रांच्या वेबआवृत्त्या सुरू झाल्या आहेत. आज देशातील नोंदणीकृत उर्दु वर्तमानपत्रांची संख्या सुमारे सहा हजारांच्या आसपास आहे. पैकी ‘उर्दू टाईम्स’, ‘सियासत’, ‘अवधनामा’, ‘नई दुनिया’, ‘आझाद हिन्द’, ‘रेहनुमा-ए-द्क्कन’, ‘मुन्सिफ़’, ‘इन्क़लाब’, ‘रोजाना हिन्द’, ‘अख़बार-ए-मश्रिक’ ही काही प्रमुख दैनिकांची नावे.
१९३१ साली ‘आलम आरा’ पासून भारतीय चित्रपटसृष्टीत बोलपटाचं युग सुरू झालं आणि त्याच वेळी उर्दू भाषेचं प्रभावी अस्तित्व चित्रपटात ठळकपणे दिसून आलं. संवाद, गीत, कथा आणि पटकथेपासून संगीत व अभिनयापर्यंत उर्दूने चित्रपटाला गहिरं सौंदर्य दिलं. आगा हश्र कश्मीरी यांची ‘यहूदी की लड़की’ ही नाट्यकृती, सहगलच्या ग़ालिब गायकीपासून ‘मिर्जा ग़ालिब’ (१९५४) या चित्रपटात सुरैयाच्या भावपूर्ण गायनापर्यंत उर्दू काव्य आणि संगीताचा प्रभाव स्पष्ट जाणवतो. ग़ालिबसह कैफ़ी आज़मी, साहिर लुधियानवी, मजरूह सुलतानपुरी, निदा फ़ाज़ली, राहत इंदौरी, गुलज़ार अशा अनेक उर्दू कवींनी गीतलेखनाला अभिजात उंची दिली. कमाल अमरोही, के. आसिफ, मुझफ्फर अली, सईद अख़्तर मिर्झा यांसारख्या दिग्दर्शकांनी, तर सलीम-जावेद, राही मासूम रज़ा, कादर खान यांसारख्या लेखकांनी उर्दू भाषेला व्यापक जनमान्यता मिळवून दिली.
मुकुल केसवन यांच्या मते, स्वतंत्र भारतात उर्दूचा शेवटचा भक्कम गड म्हणजे हिंदी चित्रपटसृष्टी होती. ही भाषा केवळ संवादापुरती नव्हती, तर एक संपूर्ण सांस्कृतिक सौंदर्यदृष्टिकोन होती. कारण उर्दू उभी राहिली होती भारतातल्या स्थानिक बोलीभाषांच्या आधारावर आणि ती ‘इंडो-इराणियन’ भाषाकुळातील फारसीच्या प्रभावातून विकसित झाली. दिल्लीच्या सत्तेला विरोध करताना बहमनी राजवटीने प्रशासकीय भाषा म्हणून उर्दूचा स्वीकार केला, हे तिचं भारतीयत्व अधोरेखित करतं. आजही चित्रपट, गाणं, शास्त्रीय संगीत आणि साहित्य या सगळ्या क्षेत्रात उर्दूचा गहिरा ठसा आहे. बिगरमुस्लिम कवींनीही उर्दूला आपली अभिव्यक्तीचं माध्यम मानलं. सुरेश भट आणि पाटणकर यांच्यापासून ग़ज़ल लेखनाची परंपरा हे त्याचं उत्तम उदाहरण आहे. उर्दू ही भारताच्या बहुभाषिक, समन्वयवादी संस्कृतीचा अविभाज्य भाग आहे.
भारतीय स्वातंत्र्य चळवळीत उर्दू भाषेचे योगदान अत्यंत मौलिक आहे. १८५७ च्या उठावाचे नेतृत्व उर्दूचे थोर कवी बहादूर शाह ज़फ़र यांनी केले. त्यानंतर इंग्रजांच्या रोषाला बळी पडलेले पहिले शहीद पत्रकार मौलवी मुहम्मद बाकर हेही उर्दू पत्रकार होते. भारतात वृत्तपत्राची सुरुवातच शाही दरबारातील ‘अख़बार’ पासून झाली, आणि उर्दू त्याचा मूळ माध्यम ठरली. त्या काळात उर्दू ही सामाजिक संवादाची सजीव भाषा होती. क्रांतिकारी काव्य आणि वृत्तपत्रांमधून तिने जाज्वल्य भूमिका बजावली. प्रगतीशील लेखक चळवळीच्या माध्यमातून तिने साहित्यविश्वातही निर्णायक हस्तक्षेप केला. मुळात भारतात परकीय आक्रमणाच्या काळापासूनच उर्दूचे बोली भाषांशी सुसंवादी संबंध जुळले. सूफी संत परंपरेने तिला प्रेम, भक्ती आणि समन्वयाच्या भाषेत घडवले. तिच्या माध्यमातून गंगा-जमनी तहजीब घडली. उर्दू ही केवळ भाषा नव्हे, तर भारतातील सांस्कृतिक एकतेचा पुल ठरली.
आपले संविधान आपल्या सुरुवातीच्या परिच्छेदातच स्पष्टपणे घोषित करते की “India, that is Bharat, shall be a Union of States”. या विधानात भारताच्या लोकशाही व्यवस्थेतील बहुसांस्कृतिकतेचा आत्मा अंतर्भूत आहे. ‘राज्यांचा संघ’ ही संकल्पना केवळ भौगोलिक एकता नव्हे, तर भाषिक, सांस्कृतिक आणि सामाजिक विविधतेचा आदर करणारी आहे. १९५६ मध्ये भारतातील राज्यांचे पुनर्रचना भाषिक आधारावर झाली, हे भाषेला मान्यताप्राप्त घटक मानण्याचा स्पष्ट पुरावा आहे. भारतात ‘इंडो-आर्यन’, ‘द्रविड’, ‘आस्ट्रिक’ आणि ‘तिब्बती-चीनी’ या चार मुख्य भाषा परिवारांची भाषिक समृद्धी आढळते. यामध्ये उर्दू ही ‘इंडो-इराणियन’ शाखेतील ‘इंडो-आर्यन’ भाषा असून ती उत्तर भारतातील अनेक राज्यांत दैनंदिन व्यवहारात वापरली जाते. उत्तर प्रदेश, बिहार, महाराष्ट्र, तेलंगणा, आंध्रप्रदेश आणि दिल्ली येथे तिचे लाखो भाषिक आहेत. २०११ च्या जनगणनेनुसार उर्दू ही भारतातील सातवी सर्वाधिक बोलली जाणारी भाषा असून तिचे सुमारे ६.२७ कोटी भाषिक आहेत.
इतकी व्यापक उपस्थिती असूनही, उर्दू भाषेला स्वतंत्र भारतात तिचा योग्य हक्क मिळाल्याची जाणीव अनेकांना होत नाही. प्रसिद्ध उर्दू साहित्यिक अली सरदार जाफ़री यांनी एक खेदजनक वास्तव मांडले होते — “उर्दू में अच्छी चीजें बहुत कम लिखी जा रहीं हैं, हालांकी ट्रेडिशन बहुत रिच है। उर्दू की यह हालत इसलिए हुई कि इसे मुसलमानों के साथ जोड़ दिया गया।” २७ मार्च २०२२ रोजी दिल्लीतील प्रेस क्लब ऑफ इंडिया येथे उर्दू पत्रकारितेच्या २०० वर्षांच्या वर्धापन दिनानिमित्तही हीच खंत व्यक्त झाली. भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात मोलाची भूमिका बजावणाऱ्या उर्दू पत्रकारितेला आणि भाषेला स्वतंत्र भारतात अंधाराच्या कोपऱ्यात ढकलण्यात आलं. देशाच्या विभाजनात उर्दूचा हात असल्याचा खोटा प्रचार करण्यात आला आणि त्यामुळे भाषेच्या विरोधाचे समर्थन झालं. आजही उर्दू भाषेला मुस्लीम धर्माशी अनावश्यकपणे जोडले जाते. पण सत्य हे आहे की ही भाषा सर्व भारतीयांची आहे. हिंदू, शीख, मुस्लिम — सर्वच समुदायांनी तिच्या विकासात योगदान दिले आहे. उर्दू ही भारताच्या सामूहिक संस्कृतीची एक अमूल्य देणगी आहे.
ब्रिटिश भारतात एकाच भाषेला दोन वेगळ्या ओळखी देण्याचा प्रयत्न झाला. वाराणसीच्या क्वीन्स कॉलेजमध्ये १८९३ साली नागरी प्रचारिणी सभा स्थापन झाली. तर कलकत्ताच्या फोर्ट विल्यम कॉलेजमध्ये मीर अम्मन आणि हैदर बक्ष यांच्या गद्य लेखनाला ‘उर्दू’, तर लल्लूलाल आणि सदल मिश्र यांच्या लेखनाला ‘हिंदी’ असे नाव देण्यात आले. दोन लिप्यांत लिहिल्या जाणाऱ्या एका भाषेला दोन वेगवेगळ्या स्वरूपात मांडण्याचा हा प्रयत्न पुढे हिंदू-मुस्लीम फूट निर्माण करण्याचा यशस्वी डाव ठरला. भाषेला सांस्कृतिकतेशी जोडत ब्रिटिशांनी त्यात हळूहळू धार्मिक आणि राजकीय रंग मिसळला.
महात्मा गांधींनी हा धोका ओळखला होता. त्यांच्या मते, उर्दू ही केवळ मुस्लिमांची भाषा नव्हती, तर भारतातच विकसित झालेली समृद्ध भाषा होती. तिचा उपयोग सामाजिक ऐक्य आणि एकात्मतेसाठी व्हावा, ही त्यांची भूमिका होती. म्हणूनच त्यांनी लिपीवर भर न देता ‘हिंदुस्तानी’ या नावाने दोन्ही लिप्यांतील भाषेला राष्ट्रीय भाषेचा दर्जा देण्याची शिफारस केली. मात्र फोर्ट विल्यम कॉलेजमधील डॉ. गिलक्रिस्ट यांच्या कार्यकाळात उर्दू आणि हिंदीसाठी स्वतंत्र व्याकरण तयार झाले. एकाच भाषेसाठी दोन वेगळी व्याकरणपुस्तके निर्माण होणे म्हणजे भाषिक दरी निर्माण होण्याचा प्रारंभच होता.
हिंदी-उर्दूतील ही फूट केवळ भाषिक नव्हती, तर सांस्कृतिक नवजागरणाच्या काळात तिची मुळे खोलवर रुजली गेली. उर्दू ही मुस्लिमांची, आणि हिंदी ही हिंदूंची भाषा असल्याचा प्रचार ब्रिटिशांनी केला. त्याला अनेक विचारवंतांनी विरोध केला. महावीरप्रसाद द्विवेदी, रामवृक्ष बेनीपुरी, रामविलास शर्मा, विद्यानिवास मिश्र आणि रविंद्रनाथ श्रीवास्तव यांसारख्या विद्वानांनी उर्दू ही शुद्ध भारतीय भाषा असल्याचे ठामपणे मांडले. तरीही आजही ही दरी मिटलेली नाही, उलट ती वाढतच चालली आहे. त्यामुळे या परिस्थितीत हिंदू-मुस्लीम समाजाच्या समान सांस्कृतिक वारशाचा नव्याने विचार करण्याची निकड निर्माण होते. आणि त्या संवादासाठी ‘उर्दू’ ही एक सशक्त आणि आवश्यक भाषा ठरते.
संदर्भ:
१. हुसैन एहतेशाम, ‘उर्दू-साहित्य का आलोचनात्मक इतिहास, लोकभारती प्रकाशन, इलाहाबाद, (२००८)
२. फारुकी शम्सुर्रहनाम, ‘उर्दू का आरंभीक युग-साहित्यिक संस्कृति एवं इतिहास के पहलू’, राजकमल प्रकाशन, नयी दिल्ली (२०२४)
३. डॉ. रणसुभे सूर्यनारायण (संपा.), ‘सामानिक समतेचा प्रवाह – फकरुद्दीन बेन्नूर स्मृतिग्रंथ’, द युनिक अकॅडमी पब्लिकेशन प्रा. लि. पुणे (२०१९)
४. डा. नदाफ अजीज, ‘हिन्दी, उर्दू और मराठी ग़ज़लों में छन्दों की योजना’, सुविद्या प्रकाशन, सोलापूर (२००७)
५. केसवानी राजकुमार, ‘कशकोल: सफीना-ए-उर्दू के ना- खुदाओं की दास्तानें’, मंजुल पाब्लशिंग हाऊस, भोपाल (२०२१)
६. वर्मा पवन कुमार, निशिकांत ठकार (अनु.); ‘ग़ालिब काळ आणि कर्तृत्व’, साहित्य अकादेमी, नवी दिल्ली (२०१०)
७. हुसैन इंतज़ार, भोळे भास्कर लक्ष्मण (अनु.), ‘मोरनामा माणि इतर कथा’, साहित्य अकादेमी नवी दिल्ली (२००७)
८. जाहिद खान (अनु. और सम्पा),’ मख़दूम मोहिउद्दीन- सूर्ख़ सवेरे का शायर’ गार्गी प्रकाशन; दिल्ली (२०२५)
९. श्रीवास्तव चंदन, ‘सिनेमा की हिंदी: भाषा के भितर भाषाएं’, हंस-हिंदी सिनेमा के सौ साल’ विषेशांक, (फरवरी-२०१३)
१०. बलराम (सम्पा.), ‘भारत का बहुभाषावाद’, संयुक्त राष्ट्र- भारत का बहुभाषावाद विशेषांक, समकालीन भारतीय साहित्य, (सितंबर- अक्टूबर- २०२३)
११. Kesvan Mukul, ‘Urdu, Awadh and the Tawaif: the Islamicate Roots of Hindi Cinema,’ in Forging Identities: Gender, Communities and the State, edited by Zoya Hasan. New Delhi: Kali for Women, (1994)