You are here:
Vasahat Kalaat

वसाहत काळात बहुजनांच्या शिक्षणासाठी महिला मिशनरींचे योगदान

ब्रिटिशांच्या ईस्ट इंडिया कंपनीचा अंमल देशाच्या विविध भागांत सुरु होण्याच्या काळात भारतातली तत्कालीन सामाजिक आणि शैक्षणिक स्थिती जाणून घेणे आवश्यक ठरते. त्याकाळात सामान्यजनांना, स्त्रियांना आणि शूद्रांना शिक्षणाच्या संधी मुळी नव्हत्याच. लिहिणे आणि वाचणे हा समाजातील केवळ उच्चवर्णियांचा अधिकार होता. ज्यावेळेस समाजातील खालच्या दर्जातील लोकांनी आणि स्त्रियांनी शिकण्याचा आणि इतरांना शिकवण्याचा प्रयत्न केला तेव्हा या प्रयत्नांना प्रखर विरोध झाला. असाच प्रकार पुढे अनेक वर्षांनी म्हणजे सावित्रीबाई फुले यांच्या काळातसुद्धा झाला होता.

`आधुनिक दृष्टीने ज्याला आपण शिक्षण म्हणतो ते जोतीबापूर्व काळात मुळी अस्तित्वातच नव्हते. जेथे वरिष्ठ वर्गाची बरीच वस्ती असे, तेथे काही शास्त्री खाजगी पाठशाला उघडीत. त्यात संस्कृत, व्याकरण, न्याय, वैद्यकशास्त्र, ज्योतिष, वेदान्त, अलंकार आणि धर्मशास्त्र हे विषय शिकविले जात. समाजातील कनिष्ठ वर्गांतील लोकांना शिक्षण घेण्याचा अधिकार नाही, अशीच सर्वत्र समजूत असे, ’’ असे धनंजय कीर यांनी `महात्मा फुले गौरव ग्रंथा’तील लेखात म्हटले आहे.

“विद्येविना मती गेली। मतिविना नीती गेली। नीतिविना गती गेली। गतिविना वित्त गेले। वित्ताविना शूद्र खचले। इतके अनर्थ एका अविद्येने केले।। ‘’जोतिबांनी लिहिलेल्या ”शेतकऱ्याचा आसूड” या पुस्तकामधील या ओळी आहेत.

देशातील सर्व जनतेसाठी आणि मुख्य म्हणजे सामान्यजनांच्या शिक्षणासाठी कवाडे पहिल्यांदाच खुले झाली ती ब्रिटिशांमुळे. मात्र हेसुद्धा अगदी सहजासहजी घडले नव्हते. ईस्ट इंडिया कंपनीकडे सत्ता असली तरी ज्ञान मिळवण्याचे आणि इतरांना ज्ञानदान करण्याचे हक्क केवळ एकाच समाजघटकाकडे म्हणजे ब्राह्मणांकडे होते, आपले परंपरागत विशेषाधिकार हक्क आणि अधिकार काढून घेण्याच्या ब्रिटिशांच्या या प्रयत्नास सनातनी ब्राह्मणांनी प्रखर आणि दीर्घकाळ विरोध केला. याविषयीच्या अनेक घटना पुण्यामुंबईत आणि इतरत्र घडल्या.

“भारतात दिवाणी आणि फौजदारी न्यायालये चालवण्यासाठी भारतातील हिंदु आणि मुस्लीम कायदे माहिती असणे आवश्यक असल्याने गव्हर्नर जनरल वॉरन हेस्टिंग्जने कोलकात्यात १७८२ला मुस्लीम कॉलेज आणि वाराणशी येथे १७९१ला संस्कृत कॉलेज सुरु केले. पुण्यात विश्रामबागवाड्यात १८२१ साली संस्कृत कॉलेज सुरु झाले तेव्हा वाराणशी कॉलेजप्रमाणे हेसुद्धा केवळ ब्राह्मण लोकांसाठीच होते.  पेशवाईच्या काळात दरवर्षी पाच लाख रुपये ब्राह्मण जातीच्या लोकांना दक्षिणा म्हणून वाटले जायचे. ब्रिटिश सरकारने ब्राह्मणांसाठी दक्षिणा चालू ठेवली तरी ही रक्कम कमी केली आणि या रकमेतील एक चतुर्शाश भाग संस्कृत कॉलेजसाठी राखून ठेवला. त्यावेळी १२० ब्राह्मण विद्वानांना ही रक्कम वाटली जाई, प्रत्येक ब्राह्मणास दरमहा पाच रुपये दक्षिणा मिळे. ही प्रथा १८३६पर्यंत चालू होती,’’ असे जॉन मरे मिचेल यांनी `इन वेस्टर्न इंडिया: रिकलेक्शन्स ऑफ माय अर्ली मिशनरी लाईफ’ या आपल्या आत्मचरित्रात म्हटले आहे.

पुण्यातील विश्रामबागेतल्या संस्कृत पाठशाळेत ( नंतर पुना कॉलेज आणि आताचे डेक्कन कॉलेज ) फक्त ब्राह्मणांनाच प्रवेश मिळत असे. हे महाविद्यालय सर्व हिंदूंना खुले करण्याचा निर्णय १८३० साली घेण्यात आला तेव्हा ब्राह्मणांचा संताप अनावर झाला होता, असे धनंजय कीर यांनी लिहिले आहे.

भारतात युरोप आणि इतर पाश्चिमात्य राष्ट्रांतील ख्रिस्ती मिशनरींनी सतराव्या शतकाच्या अखेरीस पाऊल ठेवले आणि त्यांचे आगमन या देशातील सामाजिक क्रांतीची नांदी ठरली. आपल्या मिशनकार्याचाच एक भाग म्हणून या मिशनरींनी जागोजागी आधुनिक पद्धतीच्या समाजातील सर्व घटकांना खुल्या असलेल्या शाळा सुरु केल्या हे या नव्या सामाजिक क्रांतीचे एकमेव कारण होते.

हॅना मार्शमन आणि मेरी न कुक

भारतात मुलींसाठी पहिली शाळा सुरु करण्याचे श्रेय ब्रिटिश बॅप्टिस्ट मिशनरी जोशुआ मार्शमन यांच्या पत्नी हॅना मार्शमन यांच्याकडे जाते. जोशुआ मार्शमन हे बंगालमधल्या सेरामपूर मिशनमध्ये विल्यम कॅरी यांचे एक जवळचे सहकारी होते.  हॅना मार्शमन यांना भारतातील पहिल्या महिला ख्रिस्ती मिशनरी म्हणून ओळखले जाते.

ब्रिटिशांच्या ईस्ट इंडिया कंपनीने भारतात आपली सत्ता प्रस्थापित केली आणि त्यानंतर युरोपमधील अनेक ख्रिस्ती मिशनरी या देशात येण्यासाठी प्रयत्न करू लागले. मात्र भारतात ख्रिस्ती धर्मप्रसारास उत्तेजन देण्यास ईस्ट इंडिया कंपनीचा ठाम विरोध होता.  ब्रिटीश संसदेने ईस्ट इंडिया कंपनी सरकारच्या मंजूर केलेल्या सनदेमध्ये तशी मुळी तरतूदच होती. याच कायद्यामुळे ब्रिटीश भारतात प्रवेश करणे अवघड झाल्याने मार्शमन कुटुंबाने कोलकात्याजवळ असलेल्या सेरामपूर या डचांच्या ताब्यात असलेल्या शहराची वास्तव्यासाठी १७९९ साली निवड केली. लवकरच विल्यम कॅरी हेसुद्धा सेरामपूरला स्थायिक झाले.

जोशुआ आणि हॅना मार्शमन यांनी १ मे १८०० रोजी सेरामपूर येथे ब्रिटिश मुलांमुलींसाठी दोन बोर्डिंग शाळा चालू केल्या. यापैकी एक बोर्डिंग मुलांसाठी तर दुसरी मुलींसाठी होती. त्याशिवाय या दाम्पत्याने एक विनामूल्य असलेली शाळा भारतीय मुलांसाठी सुरु केली. याच वर्षी केवळ भारतीय मुलींसाठी त्यांनी एक स्वतंत्र शाळा सुरु केली. कोलकाता इलाख्यात तब्बल ४७ वर्षे मिशनकार्य केल्यानंतर वयाच्या ८० व्या वर्षी ५ मार्च १८४७ रोजी सेरामपूर येथेच हॅना मार्शमन यांचे निधन झाले.

इंग्लंडच्या चर्च मिशनरी सोसायटीच्या मेरी ॲन कुक (१७८४- १८६८) या भारतात पाऊल ठेवणाऱ्या पहिल्या अविवाहीत महिला मिशनरी. कोलकात्यात त्यांचे १८२१ साली आगमन झाले आणि एक वर्षातच त्यांनी या शहरात मुलींसाठी शाळा सुरु केली.

चर्च मिशनरी सोसायटीची (सीएमएस) लंडनमध्ये १२ एप्रिल १७९९ साली स्थापना झाली होती.  चर्च मिशनरी सोसायटीने `जय नारायण बॉईज स्कुल’ या नावाची आपली पहिली शाळा बनारस येथे १८१८ साली सुरु केली. त्यानंतर चार वर्षानंतर मेरी ॲन कुक यांनी कोलकात्यात मुलींसाठी पहिली शाळा सुरु केली. मेरी ॲन कुक यांनी १८२२च्या डिसेंबरात कोलकात्यात २४ शाळा सुरु केल्या होत्या आणि या शाळांत तीनशे मुली शिकत होत्या.  मात्र मुलींच्या शिक्षणास समाजमान्यता मिळण्यास खूप काळ लागला.

अमेरिकेतून बोटीने एका आगळ्यावेगळ्या कामगिरीवर निघालेल्या तीन व्यक्तींनी मुंबई बंदरात १२ फेब्रुवारी १८१३ रोजी पाय ठेवला. गॉर्डन हॉल, सॅम्युएल नॉट आणि त्यांच्या पत्नी रॉक्सना नॉट या त्या तीन व्यक्ती होत्या.  त्यांच्या आगमनाने भारतात एका वेगळ्या, नव्या प्रागतिक, सामाजिक पर्वाची सुरुवात झाली. या पाश्चात्य ख्रिस्ती मिशनरींनी भारतात मुलांमुलींसाठी आधुनिक पद्धतीच्या शाळा उघडून एक क्रांती घडवली. अमेरिकेत मुख्यालय असलेल्या आणि अमेरिकन मराठी मिशन म्हणून नंतर ओळखल्या जाणाऱ्या संस्थेचे हे मिशनरी होते.

ब्रिटिश संसदेने १३ जुलै १८१३ रोजी भारतात मिशनरींच्या प्रवेशावर असलेली बंदी उठवली आणि लगेचच अमेरिकन मराठी मिशनने मुंबईत आणि शेजारच्या परिसरात कार्य सुरु केले. देशात आधुनिक पद्धतीच्या शाळा उघडण्याचे मोठे योगदान त्यांनी केले. त्यांच्यानंतर काही वर्षांतच स्कॉटिश मिशनरींनीही पश्चिम किनाऱ्यावर, मुंबईत आणि पुण्यात मुलींच्या शाळा सुरू केल्या.

“सामान्य माणसाला लिहितावाचता आले तरच तो बायबल वाचू शकणार होता. त्यासाठी मिशनरी लोकांनी मुद्रणयंत्र आणले, बायबलची छपाई सुरु केली, शाळा सुरु केल्या. अमेरिकन मराठी मिशनच्या या मिशनरींनी आपलया आगमनानंतर केवळ चार वर्षांच्या कालावधीत २५ शाळा सुरु केल्या, त्यात बाराशे मुले होती, एकही मुलगी नव्हती, असे `अमेरीकन मराठी मिशनची दीडशे वर्षे’ या ग्रंथात नमूद केले आहे.

श्री. म. पिंगे यांनी `युरोपियनांचा मराठीचा अभ्यास व सेवा’ या आपल्या ग्रंथात म्हटले आहे: “हॉल व नॉट हे मुंबईत राहिल्यानंतर व मराठी शिकल्यानंतर सन १८१५ मध्ये त्यांनी इंग्रजी शाळा काढली. त्यात प्रथम २५ मुले होती. याशिवाय दोन व्हर्नाक्युलर शाळांत ४० मुले होती, इ. स. १८१८ मध्ये ११ शाळा व ६०० विद्यार्थी होते.’’  रेव्हरँड इमॅन्युएल बिस्सेल यांनी अमेरिकन मराठी मिशनच्या सुरुवातीपासून १८१३ ते १८८१ पर्यंत शैक्षणिक कार्याच्या लिहिलेल्या अहवालानुसार १८१५ च्या मे महिन्यात मध्य भारतातील मुलांच्या पहिल्याच आणि एकमेव शाळेचा उल्लेख करण्यात आला आहे. त्याच वर्षी नोव्हेंबर महिन्यातल्या नोंदीनुसार या मिशनरींच्या शाळेत अंदाजे २५ विद्यार्थी होते.

ख्रिस्ती धर्मप्रसारकांनी उघडलेल्या या शाळा सर्वांना खुल्या होत्या. ख्रिस्ती मिशनरींच्या धोरणांनुसार स्त्री-पुरुष असा लिंगभेद न करता, जात-धर्म म्हणजे उच्च जाती किंवा अस्पृश्य असा विचार न करता शिक्षणाची कवाडे अशाप्रकारे भारताच्या इतिहासात पहिल्यांदाच सर्वांना उघडी केली होती. भारतात पहिल्यांदाच अशा प्रकारे सर्व जाती जमातींच्या आणि धर्माच्या आणि स्त्री-पुरुषांना साक्षर करणाऱ्या आधुनिक शिक्षणपद्धतीचा पाया रचला केला.

स्कुलमिस्ट्रेस गंगाबाई

अमेरिकन मराठी मिशनच्या वतीने मुलींची पहिली शाळा मुंबईत १८२४च्या मार्चमध्ये उघडण्यात आली. देशाच्या या भागात मुलींची ही पहिलीच शाळा होती. गंगाबाई या नावाच्या एक भारतीय शिक्षिका या शाळेत शिकवत असत. मुलींची ही शाळा उघडताच मुंबईतल्या दोन ब्रिटिश महिलांनी या शाळेचा सर्व खर्च उचलण्याची तयारी दाखवली. दुदैवाने त्यानंतर लगेचच मे महिन्यात प्राणघातक कॉलराची भीषण साथ पसरली. या रोगाच्या साथीने मुंबईतील हजारो लोकांचा बळी घेतला. या लोकांमध्ये या मुलींच्या शाळेतील स्कुलमिस्ट्रेस असलेल्या गंगाबाई यांचाही समावेश होता. मृत गंगाबाईंची जागा घेण्यासाठी इतर कुणीही नसल्याने मुलींची ही शाळा बंद करावी लागली.

अमेरिकन मराठी मिशनच्या १९१३ सालच्या शताब्दी सोहोळ्यानिमित्त एका निबंधात मिसेस एल. एस. गेट्स लिहितात: “माझ्या माहितीनुसार मुलींसाठी पहिली शाळा पश्चिम भारतात १८२४ साली स्थापन करण्यात आली. गंगा या नावाच्या मुलीला मिशनरी महिलांनी शिकवले होते. मुलींच्या या पहिल्या शाळेत शिकवण्याचे काम त्यांना देण्यात आले होते. काही ब्रिटिश महिला आणि पुरुषांनी या शाळेचा आर्थिक भर उचलण्याची तयारी दाखवली होती. मात्र कॉलरा साथ आली आणि निष्ठावान गंगा यांचा या प्राणघातक रोगाने बळी घेतला.”

“या पहिल्या मुलींच्या शाळेतल्या पहिल्या एतद्देशीय महिला शिक्षिका असलेल्या या गंगाबाईंबद्दल इतर काहीच माहिती उपलब्ध नाही हे सांगायला आम्हाला खूप खेद होतो,’’ असे रेव्हरंड बिस्सेल  यांनी अमेरिकन मराठी मिशनच्या  मुंबईत १८८१ साली साजरा झालेल्या अर्धशतकी वर्धापनावेळी सांगितले गेले.

या गंगाबाई स्वतः कुठे शिकल्या होत्या? स्त्रीशिक्षणाबाबत प्रचलित समाजात अत्यंत प्रतिकूल भावना असताना या मुलींच्या शाळेत शिक्षिका म्हणून काम करण्याचे धाडस त्यांनी कसे केले?  मुलींच्या या शाळेत शिकवण्यास पात्र असलेल्या आणि मुलींना शिकवण्याचे धाडस करणाऱ्या त्या एकमेव स्थानिक महिला असताना त्या गूढ आजाराने त्यांना कायमचे दूर नेले, अशी अनेक प्रश्ने काळाच्या उदरात गडप होऊन आतापर्यंत अनुत्तरित राहिली आहेत असे रेव्हरंड बिस्सेल यांनी आपल्या निबंधात म्हटले आहे.

`सावलीचा शोध’ या पुस्तकात नरेंद्र चपळगावकर यांनी स्कॉटिश मिशनच्या शिक्षणकार्याविषयी माहिती दिली आहे. डोनाल्ड मिचेल हे स्कॉटिश मिशनरी रत्नागिरीपाशी असलेल्या बाणकोट येथे १८२३च्या जानेवारीत पोहोचले होते, तेथे मराठी शिकून त्यांनी तेथे लगेच एक मराठी शाळा काढली.

जुलै महिन्यात जेम्स मिचेल आणि अलेक्झांडर क्रॉफर्ड हे दोघे सहकारी डोनाल्ड मिचेल यांना मिळाले.  लवकरच इतर मिशनरी म्हणजे जॉन कुपर आणि जॉन स्टिव्हन्सन भारतात पोहोचले.

जेम्स मिचेल, जॉन कुपर, अलेक्झांडर क्रॉफर्ड आणि जॉन स्टिव्हन्सन हे सर्व मिशनरी विवाहित होते आणि त्यांच्या पत्नींचे त्यांच्या मिशनकार्यांत आणि शिक्षणकार्यात सहकार्य होते. त्याकाळात देशात मुलींना शिक्षण देण्यासाठी केवळ महिला शिक्षक असणे आवश्यक होते. भारतात स्त्रीशिक्षणासाठी अत्यंत महत्त्वाचे योगदान या मिशनरींच्या पत्नींनी दिले आहे आणि अशा मिशनरी महिलांची यादी मोठी आहे. पुढे जोतिबा फुले स्त्रीशिक्षणासाठी सावित्रीबाईंची मदत घेतली. साधारणतः असेच चित्र त्यानंतर जवळजवळ सहासात दशके कायम राहिले. सर विल्यम हंटर शिक्षण आयोगाला १८८२ सालच्या पुणे भेटीत पुणे नगरपालिकेने मुलींच्या शाळेत जाण्याची परवानगी नाकारली अशी खंत खुद्द आयोगाने व्यक्त केली आहे.

बाणकोट आणि हर्णै येथे १८२९ च्या दरम्यान स्कॉटिश मिशनच्या शाळांची संख्या ८० पेक्षा जास्त होती, त्यात तीन हजारांहून अधिक विद्यार्थी शिकत होते आणि विशेष म्हणजे त्यापैकी तीनशेपेक्षा अधिक मुली होत्या, असे चपळवकर यांनी लिहिले आहे.

पुण्याला १८३० साली स्थायिक झाल्यानंतर जॉन स्टिव्हन्सन यांनी या शहरात एक इंग्रजी शाळा सुरु केली होती. मात्र ईस्ट इंडिया कंपनीच्या सरकारला मुंबईप्रमाणेच पुण्यातही इंग्रजी शाळा सुरु करायच्या होता. त्यामुळे स्टिव्हन्सन यांनी आपली शाळा १८३३ साली कंपनी सरकारकडे सुपूर्द केली.  विशेष म्हणजे रेव्हरंड जॉन स्टिव्हन्सन यांनी सुरु केलेल्या आणि नंतर ईस्ट इंडिया सरकारकडे सुपूर्द केलेल्या या शाळेतच जोतिबा फुले आणि त्यांचे सहकारी सदाशिव बल्लाळ गोवंडे, मोरो विठ्ठल वाळवेकर यांनी आपले शिक्षण घेतले होते.  स्कॉटिश मिशनच्या या शाळेतील जोतिबा फुले आणि इतर विद्यार्थ्यांनी पुढे महाराष्ट्रात आणि भारतातसुद्धा मोठी सामाजिक क्रांती घडवून आणली.

जॉन आणि मार्गारेट विल्सन

जॉन आणि मार्गारेट विल्सन यांचे १८२८ ला स्कॉटलंडहून मुंबईत आगमन झाले. त्यावेळी त्यांचा नुकताच विवाह झाला होता. कोकणातील आपला मराठीचा अभ्यास संपवून जॉन आणि मार्गारेट विल्सन मुंबईत परतले.  मार्गारेट या कोकणात हर्णैला असताना स्कॉटिश मिशनने सुरू केलेल्या मुलींच्या शाळांत रस घेऊ लागल्या होत्या. अमेरिकन मराठी मिशनने त्यापूर्वीच मुंबईत मुलींच्या शाळा सुरु केल्या होत्या. विल्सन दाम्पत्याने मुंबईत अंब्रोळीच्या मिशन हाऊसमध्ये २९ डिसेंबर १८२९ रोजी शाळा सुरु केली. मुलींना मार्गारेट विल्सन शिकवत असत, या शाळेत पहिल्या तीन महिन्यातच ५३ मुली शाळेत दाखल झाल्या होत्या. मार्गारेट यांनी आपल्या घरातच मुलींची शाळा चालू केली होते, त्यापैकी काही मुली अपंग तर काही अनाथ होत्या.  पुढील चार महिन्यात मुलींच्या शाळांची संख्या सहा झाली. या शाळांत १२० मुली शिकत होत्या. मार्गारेट विल्सन यांच्या शाळांतील मुलींची संख्या १८३२ साली १७५ पर्यंत पोहोचली होती.

मार्गारेट विल्सन यांनी अंब्रोळी मिशन हाऊसमध्ये सुरु केलेल्या मुलींच्या इंग्रजी शाळेला अंब्रोळी इंग्लिश स्कुल’ या नावाने ओळखले जात असे.  या शाळेतील मुलींना शिक्षणाबरोबरच कपडेलत्ते आणि जेवणासाठी थोडीशी रक्कम दिली जाई. ही शाळा सुरु झाल्यानंतर तीन वर्षातच यापैकी सात मुली मार्गारेट यांच्या देखरेखीखाली मिशन हाऊसमध्येच राहू लागल्या.

मार्गारेट विल्सन यांनी पुढील सहा महिन्यांत सहा शाळा मुंबईत सुरु केल्या आणि या शाळांत १२५ मुली शिकत होत्या. या शाळांत सर्वाधिक हिंदू मुली होत्या, पारशी आणि मुस्लिम मुस्लीम मुलीही होत्या. या सहांपैकी एक शाळा आजही सेंट कोलंबा हायस्कुल फॉर गर्ल्स या नावाने प्रसिद्ध आहे. प्रामुख्याने मराठी माध्यम होते. अंब्रोळी इंग्लिश स्कुलची परिक्षा सार्वजनिक रीतीने होई. भारतात हे पहिल्यांदाच होत होते, अशाप्रकारे आधुनिक शिक्षणपद्धतीचा पाया रोवला जात होता

भारतात मुलींच्या शिक्षणाबाबत मोलाचे योगदान करणाऱ्या मार्गारेट विल्सन यांना मात्र फारच अल्प आयुष्य लाभले. नाजूक प्रकृतीच्या मार्गारेट आजारी पडल्यानंतर त्यांचे १९ एप्रिल १८३५ला मुंबईतच निधन झाले. मृत्युशय्येवर असताना मार्गारेट यांनी `शक्य असल्यास मुलींच्या शाळेचे कार्य त्यांच्यानंतरही चालू ठेवावे’, अशी कळकळीची विनंती जॉन विल्सन यांना केली.

मार्गारेट आणि जॉन विल्सन यांच्या सेवेतून अंब्रोली चर्च, विल्सन कॉलेज, विल्सन हायस्कूल, सेंट कोलंबा गर्ल्स स्कूल वगैरे शैक्षणिकसंस्था २०० वर्षापूर्वी सुरु झाल्या. पुढील काळात म्हणजे १८५७ साली मुंबई विद्यापीठाची स्थापना करण्यात जॉन विल्सन यांचे महत्त्वाचे योगदान होते. देशातील या पहिल्यावहिल्या विद्यापीठाचे उपकुलगुरूपद हे पद जॉन विल्सन यांना १८६९ साली देऊन शिक्षणक्षेत्रातील त्यांच्या योगदानाची दाखल घेतली गेली.  भारतात पहिल्यांदाच प्राथमिक शाळा ते उच्च शिक्षण अशी सेवा उपलब्ध करून देऊन शिक्षणक्षेत्रात मोठी मजल मारणाऱ्या रेव्हरंड डॉ. जॉन विल्सन यांना आधुनिक भारतीय शिक्षणक्षेत्रातील पितामह म्हणता येईल.

सिंथिया फरार

अमेरीकन मिशनची मुंबईत भायखळा इथली गंगाबाई या भारतीय शिक्षिका असलेल्या मुलींची पहिली शाळा १८२४ला सुरु झाली. त्यानंतर कॉलराच्या साथीमध्ये गंगाबाईंच्या झालेल्या निधनामुळे मुलींची ही शाळा अल्पावधीत बंद पडली. अमेरिकन मिशनतर्फे लगेचच पुन्हा नव्या जोमाने मुलींची शाळा उघडण्याचे प्रयत्न झाले.   त्यानंतर अमेरिकन मिशनच्या आणखी काही मिशनरींचे मुंबईत २९ डिसेंबर १८२७ रोजी आगमन झाले होते आणि या मिशनरींमध्ये मिस सिंथिया फरार यांचा समावेश होता,

सिंथिया फरार यांची एक अत्यंत महत्त्वाची ओळख म्हणजे जोतिबा फुले यांना स्त्रीशिक्षणासाठी प्रेरित करणाऱ्या या मिशनरी तसेच सावित्रीबाई फुले यांच्या शिक्षिका.

सिंथिया फरार यांचा जन्म २० एप्रिल १७९५ रोजी न्यु हॅम्पशायर येथे झाला होता.  अमेरिकन मराठी मिशनच्या दस्तऐवजांत १८१३ ते १८८१ या कालखंडात भारतात कार्य केलेल्या सर्व मिशनरींच्या सेवेचा कालखंड देण्यात आला आहे. त्या यादीत `मिस सिंथिया फरार- आगमन २९ डिसेंबर १८२७, निधन २५ जानेवारी १८६२’ अशी नोंद आहे.

मुंबईत आल्यावर फरारबाईंनी  यांनी अमेरिकन मराठी मिशनच्या मुलींच्या शाळांचा दर्जा उंचावण्यासाठी प्रयत्न केले. मिशनच्या १८२९ सालच्या विद्यार्थिनींची संख्या चारशेहून अधिक झाली आहे असे म्हटले आहे. अमेरिकन मराठी मिशनच्या १८३४ सालच्या अहवालात मिशनच्या मुंबईच्या शाळांची माहिती दिली आहे. त्यात तेथल्या कार्यरत मिशनरींच्या यादीत मुलींच्या शाळांच्या `सुपिरिटेंडंट मिस सी. फरार’ असा उल्लेख आढळतो. अहमदनगरमध्ये १८३५ साली अमेरिकन मराठी मिशनच्या नऊ शाळा होत्या.

प्रकृती बिघडल्यामुळे काही काळ सिंथिया फरार १८३७ साली मुंबईहून अमेरिकेत परतल्या होत्या.  अमेरिकेतून १८३९ला पुन्हा भारतात आल्यानंतर फरारबाईं अहमदनगर येथे अमेरिकन मराठी मिशनच्या शाळेत रुजू झाल्या आणि त्यांच्या मृत्यूपर्यंत तिथेच त्या राहिल्या. अमेरिकन मराठी मिशनच्या १८४५ आणि १८४६ सालच्या अहवालात म्हटले होते कि “मिस फरार यांच्या सुपरिंटेंडंटपदाच्या देखरेखीखाली मुलींच्या चार शाळा सुरु आहेत आणि या शाळांत १०० विद्यार्थिनी आहेत.”

या शाळांच्या अधिक्षक या नात्याने फरारबाईंनी ज्या प्रकारच्या समस्यांना तोंड द्यावे लागत होते ते पाहता इतर कुणी असे कष्ट करण्याचे धाडसच केले नसते. मुलींना शिक्षण देण्याबाबत समाजात विरोध असल्याने या शाळांतील मुलींनी शिक्षणात केलेल्या प्रगतीबद्दल त्यांच्या पालकांना अजिबात कौतुक नसायचे. त्यामुळे आपल्या मुली नियमितपणे शाळांत जाण्याची गरज आहे असे त्यांना बिलकुल वाटत नसे. कुठल्याही निमित्ताने किंवा कारणाखाली या मुलींना शाळेत पाठवणे अचानक बंद केले जाई किंवा या मुलींना कुठल्याही निमित्ताने परगावी महिनाभर किंवा थेट काही महिन्यांसाठी पाठवले जाई.

मुलींचे लहानपणीच लग्न लावून देण्याची पद्धत तर त्यांच्या शिक्षणासाठी एक मोठा अडसर होता.  सिंथिया फरार यांनी त्यांच्या शाळांत शिकणाऱ्या मुलींचे प्रेम संपादन केले, त्यांच्यामध्ये शिकण्याची गोडी निर्माण केली आणि अशाप्रकारे शिक्षणात किमान थोडीफार प्रगती होईल इतका काळ या मुलींनी शाळांत येण्यासाठी त्यांना प्रवृत्त करण्यात त्या यशस्वी ठरल्या.  तरीसुद्धा “आपल्या शाळांतील अनेक मुलींना लवकरच शाळेतून काढले गेले आणि त्यामुळे आंपल्या आयुष्यभरातल्या शैक्षणिक कामात फार थोडे यश मिळाले’’ अशी खंत फरारबाई अनेकदा व्यक्त करत असत.

सिंथिया फरार यांच्या स्त्रीशिक्षणविषयक कार्याचा महात्मा फुले यांच्यावर गाढ प्रभाव पडला होता असे त्यांनी स्वतः लिहिले आहे. अहमदनगर येथे नोकरीला लागलेले त्यांचे मित्र सदाशिवराव गोवंडे यांच्यामुळे ते फरार मॅडमच्या शाळेत गेले होते. याबाबत धनंजय कीर यांच्या `महात्मा जोतीराव फुले’ या पुस्तकात खालील उल्लेख आहे.

” ते मुलींची शाळा उघडण्याच्या विचारात असता त्यांचे परम स्नेही सदाशिवराव गोवंडे यांची ‘रस्ते आणि थळी खाते’ कार्यालयातून अहमदनगरच्या न्यायखात्याच्या कचेरीत बदली झाली.  नोकरीवर रुजू होण्यासाठी सदाशिवराव गोवंडे अहमदनगरला गेले तेव्हा त्यांनी आपल्याबरोबर जोतिबांना नेले. त्याकाळी अहमदनगर हे ख्रिस्ती मिशनऱ्यांनी चालविलेल्या शिक्षणकार्याचे एक मोठे केंद्र बनले होते. तेथे गेल्यावर एके दिवशी सदाशिवराव गोवंडे व जोतिबा ह्यांनी अमेरिकन मिशनमधील मिस फरारबाईंच्या शाळेला भेट दिली.

मुलींची शाळा काढण्यापूर्वी आपण कोणत्या गोष्टी केल्या ह्याविषयी जोतिबा म्हणतात: “ अहमदनगर येथील अमेरीकन मिशनमधील मिस फरार या बाईने चालविलेल्या शाळा मी एका मित्रांसमवेत पाहिल्या. ज्या पद्धतीने त्या मुलींना शिक्षण देण्यात येत होते ती पद्धत पाहून मी फार खुश झालो. ‘’

“हिंदुस्थानात स्त्रीशिक्षणाकडे दुर्लक्ष करण्यात येते याबद्दल जोतिबा आणि गोवंडे यांच्याजवळ मिस फरारने अत्यंत दुःख व्यक्त केले. आपल्या देशाची सुधारणा करण्यासाठी परकीय लोक जे चिकाटीने प्रयत्न करीत होते ते पाहून जोतिबा आणि गोवंडे यांचा मनावर फारच चांगला परिणाम झाला. आपल्या देशबांधवांच्या सुधारणेकडे आपले लोक दुर्लक्ष करतात याविषयी त्यांना खंत वाटली. यास्तव प्रत्येकाने आपल्या पत्नीस शिक्षण देऊन शिक्षणप्रसाराच्या कार्यात तिचे साहाय्य घ्यावे, असे त्यांनी ठरविले. त्याप्रमाणे जोतीराव पुण्यास परत आल्यावर त्यांची पत्नी सावित्रीबाई ह्यांचे शिक्षण सुरु करण्यात आले आणि त्यांनी स्वतः कनिष्ठ वर्गातील मुलींसाठी. एक शाळा उघडली. ‘’

जोतिबा म्हणतात: ”मी पुण्यास येताच कनिष्ठ वर्गातील मुलींसाठी एक शाळा सुरु केली. मात्र त्या शाळेत ज्या मुलांना शिक्षण घेण्याची आवड असेल त्यांनाही प्रवेश दिला. या शाळेत मी वाचन, अंकगणित आणि व्याकरणाची मूलतत्त्वे हे विषय शिकवीत असे”.

“महात्मा फुले: शोधाच्या नव्या वाटा” या पुस्तकाच्या प्रस्तावनेत हरी नरके यांनी लिहिले आहे: ‘’सावित्रीबाईनी अहमदनगर येथे फरारबाईंच्या व पुण्यात मिचेलबाईंच्या नॉर्मल स्कूलमध्ये अध्यापनाचे प्रशिक्षणही घेतले होते.’’

अमेरीकन मराठी मिशनच्या वतीने फरारबाई यांच्यावर १८६२ साली लिहिलेल्या मृत्युलेखात महात्मा जोतिबा फुले यांचे प्रत्यक्ष नाव न घेता पुढील संदर्भ देण्यात आला आहे:

`मुलींना शिक्षण देण्याची खूप इच्छा असलेल्या पुणे शहरातील एका तरुण सद्गृहस्थाला मिस फरार यांनी आनंदाने सल्ला आणि मार्गदर्शन पुरवले. मुलींच्या शाळा सुरु करण्याबाबत आणि या शाळांचे व्यवस्थापन करण्याबाबत फरार यांनी या तरुणाला मार्गदर्शन केले. अहमदनगरहून पुण्याला परतल्यावर या तरुणाने हिंदू मुलींना शिक्षण देण्यासाठी तेथे शाळा सुरु केल्या. मुलींच्या या शाळांना स्थानिक लोकांनी तसेच काही सत्प्रवृत्त ब्रिटिश लोकांनीं मदत केली आणि या शाळांनी पुढील काही वर्षांत खूप प्रगती केली. ‘’

सिथिया फरारबाईंचे वयाच्या ६७ व्या वर्षी २५ जानेवरी १८६२ रोजी अहमदनगर येथे निधन झाले.  अमेरिकन मराठी मिशनच्या फरारबाई यांच्याबाबत अमेरिकन मराठी मिशनच्या १९२०च्या अहवालात खालील माहिती आढळते:  “या मिशनच्या कार्यात सहभागी होणाऱ्या सिंथिया फरार या पहिल्या अविवाहित अमेरिकन महिला होत्या. भारतातल्या महिला आणि मुलींसाठी त्यांनी आपले कार्य त्यांना २५ जानेवारी १८६२ रोजी बढती मिळेपर्यंत (निधनापर्यंत) सतत चालूच ठेवले. त्यांच्या सन्मानाप्रित्यर्थ, या मिशनने अहमदनगर येथील मुलींच्या तीन डे -स्कुल्सचे नाव – द फरार स्कुल्स’ असेच ठेवले आहे. ‘’

नाशिकच्या कॅरोलीन फरार

उत्तर महाराष्ट्रात नाशिक येथे चर्च मिशनरीज सोसायटीच्या मिशनरींनी १८३० साली आपले मिशनकार्य सुरु करुन तेथे लगेच मुलांमुलींसाठी शाळा सुरु केल्या आणि या परिसरात आधुनिक शिक्षणाचा पाया रोवला.

रेव्हरंड चार्ल्स पिनहॉर्न फरार, त्यांच्या पत्नी कॅरोलीन फरार आणि रेव्हरंड विल्सन डिक्सन या तिघांनी दक्षिणेची काशी गणलेल्या नाशिकमध्ये आधुनिक आणि इंग्रजी शिक्षणाचा पाया रोवला. पुढे अनेक वर्षे नाशिक परिसर चर्च मिशनरी सोसायटीच्या शिक्षण आणि मिशनकार्याचे एक प्रमुख केंद्र बनले होते.

चार्ल्स पिनहॉर्न फरार यांचा जन्म इंग्लंडमध्ये २१ सप्टेंबर १७९८ला झाला होता. कॅरोलीन टर्नर यांच्याशी २६ जानेवारी १८२९ रोजी त्यांचा विवाह झाला. कॅरोलीन यांचा जन्म ६ एप्रिल १८०६ रोजी झाला होता. विवाहानंतर लवकरच हे दाम्पत्य मिशनकार्यासाठी भारतात आले.

मिसेस कॅरोलीन फरारने नाशकास आल्यावर मुलींसाठी शाळा काढण्याचे प्रयत्न केले. ऑक्टोबर १३, १८३२ या दिवशी त्यांच्या रोजनिशीत पुढील उल्लेख आढळतो:   “तीन लहान मुली शाळेस येऊं लागल्या होत्या. पण आज आपण शाळा सोडून जाणार, असा प्रत्येकीने निश्चय केला होता. ज्या बाईपासून शाळेची खोली भाड्याने घेतली होती, तिला दुप्पट भाडे कबूल केले तरी ती खोली भाड्याने देईना. लोकांना वाटते की, लालूच देऊन, अगर जबरदस्ती करून किंवा फसवून त्यांना आम्ही ख्रिस्ती करण्यास कमी करणार नाही.”

मिसेस कॅरोलीन फरारने दुसरी योजना केली होती व ती सफळ झाली. निराश्रीत मुलींसाठी एक मोफत शाळा उघडण्याचे त्यांनी ठरविले. या मुलींना लिहीणे, वाचणे व शिवणकाम शिकवून पोषणार्थ रोजी पाव आणा प्रत्येकीस देण्याचे त्यांनी ठरविले. निराश्रीत म्हणजे जिला बाप अगर नवरा नाही अशाच मुली शाळेत घ्यावयाच्या होत्या. ही ज्या वाड्यात मिसेस फरार राहात होत्या, त्यातच उघडावयाची होती. बऱ्याच अडचणी आल्या, तरी वर्षाखेरीस मिसेस फरार असा रिपोर्ट लिहितात की, ”शाळेत मुलींची संख्या १८ आहे. त्यापैकीं सर्व मुळाक्षरें शिकून आता गणित शिकत आहेत.’’

फरार दाम्पत्य १८४७ साली इंग्लंडला कायमचे परतले. इंग्लंडला परतल्यानंतर कॅरोलीन फरार यांचे वयाच्या ५४ व्या वर्षी १६ एप्रिल १८६० रोजी निधन झाले.

फुले दाम्पत्याचे शिक्षक जेम्स आणि मार्गारेट मिचेल

जेम्स मिचेल यांचा जन्म स्कॉटलंडमध्ये स्टर्लिंग येथे १८०० साली झाला होता. पुण्यात स्थायिक झालेल्या जॉन स्टिव्हन्सन यांनी १८३४ साली मिशनरीपद सोडून ईस्ट इंडिया कंपनीचे चॅप्लेन किंवा धर्मगुरुपद स्विकारल्यानंतर दख्खनच्या आणि या शहरातल्या स्कॉटिश मिशनस्थानाची धुरा जेम्स मिचेल यांच्याकडे आली. जेम्स मिचेल १८३४ पासून त्यांच्या आयुष्याच्या अखेरीपर्यत पुढील चौतीस वर्षे पुण्यात काम करत राहिले.

जोतिबा फुले गौरव ग्रंथाच्याअखेरीस दिलेल्या जोतिबांच्या संक्षिप्त चरित्रपटात म्हटले आहे: १८४१-४७ मिशनरी शाळेतील माध्यमिक (इंग्रजी) शिक्षण घेतले..

जोतीराव फुले स्कॉटिश मिशनरीच्या म्हणजेच जेम्स मिचेल यांच्या शाळेत इंग्रजी शिक्षणाची शेवटची परीक्षा १८४७ साली पास झाले. त्यावेळी जोतिबाचे वय होते वीस वर्षे. त्याकाळात त्या तुलनेने जोतिबा फुले खूप शिक्षित होते, तरीसुद्धा त्यांनी मोठ्या पगाराची सरकारी नोकरी स्वीकारणे टाळले. त्याऐवजी सामाजिक सुधारणा राबवण्याचा खडतर आयुष्याचा पर्याय निवडला हे त्यांचे खूप मोठेपण. पुढच्याच वर्षी म्हणजे १८४८ला जोतिबा आणि सावित्रीबाई या तरुण दाम्पत्याने पुण्यात स्वतःच शाळा काढली.

विल्यम हंटर शिक्षण आयोगापुढे पुणे येथे १९ ऑकटोबर १८८२ रोजी सादर केलेल्या निवेदनात जोतिबा फुले यांनी ख्रिस्ती मिशनरींनी मुलींसाठी सुरु केलेल्या शाळांमुळे आपल्याला प्रेरणा मिळाली, आपण आपल्या शाळा नंतर मिसेस मिचेल यांच्याकडे चालवण्यासाठी दिल्या, तसेच ख्रिस्ती मिशनरींच्या शाळेत आपण स्वतः शिक्षक होतो असे नमूद केले आहे.

सावित्रीबाईनी पुण्यात मिसेस मिचेल यांच्या शाळेत अद्यापनाचे धडे घेतले असा नेहेमी उल्लेख होतो.  पुण्यात स्थायिक झालेल्या स्कॉटिश मिशनरी जेम्स मिचेल यांनी स्कॉटिश लेडीज असोसिएशन फॉर फिमेल एज्युकेशन इन इंडिया या संस्थेकडे स्त्रीशिक्षणासाठी मदत मागितली. जेम्स मिचेल यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत लेडीज असोसिएशनने मार्गारेट शॉ या तरुणीला १८४१ साली भारतात पाठवले. जेम्स मिचेल आणि मार्गारेट शॉ यांचा १८४२ साली विवाह झाला.  जेम्स मिचेल यांचा हा दुसरा विवाह.

भारतात १८२३ साली भारतात आगमन करणाऱ्या स्कॉटिश मिशनरींच्या तुकडीतले जेम्स मिचेल यांच्यासह सर्व मिशनरी विवाहित होते. आपल्या मिशनरी पतींच्या कार्यांत विविध मार्गाने त्यांच्या पत्नी सहभागी होत असत. हे मिशनरी शाळा उघडत असत तेव्हा मुलींच्या शिक्षणाची आणि बोर्डिंगची व्यवस्था त्यांच्या पत्नी पाहत असत.  स्कॉटिश मिशनरी जॉन स्टिव्हन्सन आणि जेम्स मिचेल यांनी कोकणात हर्णे आणि बाणकोट परिसरात मिशनकार्य सुरु केले, शाळा उघडल्या. जेम्स मिचेल यांच्या पहिल्या पत्नीसुद्धा अशाप्रकारे आपल्या पत्नीच्या कामात सहभागी झाल्या होत्या.

मात्र मिसेस मिचेल यांचे कोकणात दापोली येथे १७ जानेवारी १८३२ रोजी निधन झाले.  पतीसह स्कॉटलंडहून भारतात येऊन कोकणात स्थायिक झालेल्या आणि तेथेच आधुनिक शिक्षणाच्या मुलींसाठी पहिल्या शाळा स्थापन करणाऱ्या मिसेस मिचेल यांचा अकाली मृत्यू झाला होता.  स्कॉटिश मिशनच्या दस्तऐवजांत आणि पुस्तकांत या सामाजिक सुधारक महिलेचा केवळ उल्लेख `फर्स्ट मिसेस मिचेल’ म्हणजे `जेम्स मिचेल यांच्या पहिल्या पत्नी’ किंवा कोकणातील  `बाणकोटच्या मिसेस मिचेल’ असाच उल्लेख आढळतो, त्यांचे छायाचित्र मिळणे तर अधिक अवघड. तरीही दूर कोकणात अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत मुलींसाठी शाळा आणि बोर्डिंग चालवणाऱ्या या `फर्स्ट मिसेस मिचेल’ यांच्या योगदानाची दखल घ्यायलाच हवी

मार्गारेट शॉ मिचेल यांना मदत करण्यासाठी त्यांची बहिण मिस जोना शॉ स्कॉटलंडहून भारतात २८ जानेवारी १८४५ रोजी आल्या. त्याकाळात मार्गारेट शॉ मिचेल यांनी पुण्यात मुलींच्या अनेक शाळा सुरु केल्या होत्या आणि त्या स्वतः या शाळांच्या सुपरिटेंडंट होत्या.

महाराष्ट्रातील किंबहुना संपूर्ण भारतात महिला शिक्षिकांसाठी पहिल्यांदाच व्यावसायिक अध्यापन अभ्यासक्रम सुरु करण्याचा मान अशाप्रकारे अहमदनगरच्या सिंथिया फरारबाईंकडे आणि पुण्यात स्कुल चालवणाऱ्या मार्गारेट शॉ मिचेल यांच्याकडे जातो. सावित्रीबाई फुले आणि सगुणाबाई क्षीरसागर या मिचेलबाईंच्या अध्यापन प्रशिक्षण संस्थेमधील काही पहिल्यावहिल्या विद्यार्थिनींमध्ये असतील.  सिंथिया फरार, मार्गारेट शॉ मिचेल आणि जेम्स मिचेल यांच्यासारखे मिशनरी काळाच्या किती पुढे होते हे दिसून येते.  मार्गारेट शॉ मिचेल यांनी पुढील दोन दशके म्हणजे १८६३ पर्यंत मुलींच्या बोर्डिंग स्कुल आणि डे-स्कुल्सच्या सुपरिटेंडंट म्हणून कार्य केले.

अमेरिकन मराठी मिशनच्या अहमदनगर शहरातल्या संस्थांत सिंथिया फरार यांचे आज काही नामोनिशाणही राहिले नसले तरी त्यांच्या महान शैक्षणिक आणि सामाजिक कार्याचे महत्त्व नाकारता येत नाही.  एकोणिसाव्या शतकाच्या अगदी सुरवातीस बंगालमध्ये सेरामपूर येथे शाळा उघडणाऱ्या हॅना मार्शमन, कोलकाता येथे मेरी ॲन कुक (विल्सन), कोकणातील `बाणकोटच्या मिसेस मिचेल’, मुंबईत मार्गारेट विल्सन, नाशिक येथे कॅरोलीन फरार, पुण्यात मार्गारेट मिचेल आणि मुंबई व अहमदनगर येथे सिंथिया फरार या महिलांनी स्त्रीशिक्षणासाठी आणि महिला सबलीकरणासाठी मोठे योगदान दिले. या महिलांच्या या कार्यांची नोंद घेणे आणि त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करणे योग्य ठरेल.

कामिल पारखे

कामिल पारखे पत्रकार, संपादक आणि लेखक आहेत. मराठी आणि इंग्रजी वृत्तपत्रसृष्टीत त्यांनी मौलिक कामगिरी केली आहे. महाराष्ट्रातील राजकारण, समाजकारण आणि माध्यमजगतातील घडामोडींवर ते सातत्याने अभ्यासपूर्ण लेखन करतात. अभ्यासू आणि सजग पत्रकार म्हणून ते ओळखले जातात.