“The old world is dying, and the new world struggles to be born: now is the time of monsters.” – Antonio Gramsci
ग्रॉमशीचं हे वाक्य आजच्या काळाचं अचूक चित्र आहे. जुनं जग ढासळतंय. विचार, संवेदना आणि स्वातंत्र्याला वाव देणारं नवं जग जन्माला यायचं आहे. आपण संक्रमणकाळातून जात आहोत. नेमक्या अशा वळणावरच समाजविघातक प्रवृत्ती डोकं वर काढतात. जेव्हा विचार करणं सुद्धा अपराध ठरतं. मात्र इतिहास हे सांगतो की अशा अंधारातच सृजनाचा नवा अंकुर फुटत असतो.
अभिव्यक्ती ही माणसाची नैसर्गिक प्रवृत्ती आहे. तो त्याच्या अस्तित्वाचा अविभाज्य भाग आहे. बोलणं, लिहिणं, प्रश्न विचारणं, हेच खर्या अर्थाने जगण्याचं लक्षण आहे. पण आज या अभिव्यक्तीवर संकट आलं आहे. संस्कृती आणि राष्ट्रहिताच्या नावाखाली स्वातंत्र्याचा गळा आवळला जात आहे. असे असले तरी अभिव्यक्तीचा आवाज माणसाच्या आत्म्यातून सतत उमटत राहतो. कारण ती अगदी नैसर्गिक आणि स्वाभाविक गोष्ट असते. माणसाच्या अंतःप्रेरणेने ते घडत असते. म्हणूनच प्रत्येक दडपशाही नव्या अभिव्यक्तीला जन्माला घालत असते.
दोन महिन्यांपूर्वी लंडनच्या न्यायालयाच्या भिंतीवर एका रात्री प्रकटलेलं बँक्सीचं चित्र वर दिलं आहे. हे केवळ भित्तिचित्र नाहीये तर ते एक विधान आहे. त्याने न्यायव्यवस्थेवर प्रश्न उपस्थित केला आहे. ही एक विलक्षण कलात्मक अभिव्यक्ती आहे. एक न्यायाधीश शांततामय निदर्शकावर हातोडा चालवत आहे. निदर्शक पडलेला असला तरी, हातातील निषेधपत्रक ढालीसारखं उंचावून तो स्वतःचं रक्षण करतो आहे. त्या कागदावर रक्ताचे डाग स्पष्ट दिसतायत. हे दृश्य भयावह पण उद्बोधक देखील आहे.
बँक्सी हा कलाकार नेहमीच समाजाच्या विसंगतींवर भाष्य करतो. समाजाच्या वेदनांना स्वर देतो. त्याची कला गॅलरीत नसते तर ती सार्वजनिक अवकाशात असते. हे चित्र न्यायालयाच्या भिंतीवर आढळलं, तेव्हा न्यायव्यवस्थेने ते झाकून टाकलं. म्हणजे चित्रावरच न्यायालयाने बंदी घातली. पण लोकांनी ते पाहणं आणि फोटो घेणं थांबवलं नाही. हेच कलेचं सामर्थ्य आहे. ती दडपली तरी संपुष्टात येत नाही. उलट, दडपलं तर ते अधिक उफाळून येतं. बँक्सीचं चित्र त्या अर्थाने संपूर्ण व्यवस्थेला प्रश्न विचारतं.
पॅलेस्टाईनमधील दमन, निदर्शकांवरील अत्याचार या संदर्भात हे चित्र आहे. बँक्सीने यापूर्वीही गाझा, सीरिया आणि यूक्रेनसाठी अशाच ग्राफिटीज काढल्या आहेत. अशाप्रकारे त्याने भिंतींनाच बोलकं केलं आहे. हे भित्तिचित्र प्रत्यक्षात विवेकाचा उद्घोष आहे. ते सांगतं की, जेव्हा व्यवस्था दमन करते, तेव्हा कला बोलू लागते. जेव्हा न्यायालय मौन पाळतं, तेव्हा भिंतीच न्याय मागू लागतात. भारतीय संदर्भातही हे चित्र लागू पडतं.
भारतीय आसमंत आज काळवंडले आहे. बरेच लेखक-कलाकार भय, लोभ आणि अनास्थेच्या त्रिकोणात अडकले आहेत. सत्तेच्या दडपशाहीचं भय, सन्मान-पुरस्कारांचा लोभ आणि समाजदुःखाविषयीची वाढती उदासीनता, या तिन्ही गोष्टींनी आज अभिव्यक्तीचा गळा दाबला आहे. सेन्सॉरशिप केवळ कायद्यात नाही, तर मनात रूजली आहे. आज कलाकार बोलण्यापूर्वी भीतीने थबकतो. सत्ता त्याला आकर्षित करते. निमंत्रणं, मंच, पुरस्कार देऊन त्यांना ‘सिस्टीम’चा भाग बनवते. काही कलाकारांची अराजकीय भूमिका म्हणजे सत्तेचं मौन सेवकत्व ठरते. अनास्था हा या त्रिकोणाचा सर्वांत घातक कोन आहे; ती कलावंताला लोकांच्या वेदनेपासून तोडते. तो शेतकऱ्याच्या दु:खाचं सौंदर्यीकरण करतो, पण वास्तवातील प्रश्नांबद्दल बोलत नाही. अशा स्थितीत कला सत्तेची गुलाम बनते.
सर्जनशीलता म्हणजे केवळ सौंदर्यनिर्मिती नव्हे, तर सत्याशी संवाद साधण्याचं धैर्य. कला आणि साहित्य कल्पनेचा खेळ नाहीत; ते समाजाच्या अस्वस्थतेला आवाज देतात. खरं सर्जन म्हणजे सजावट नव्हे, तर विरोधाची अभिव्यक्ती. प्रामाणिक कलाकृती सत्तेच्या चकव्यात अडकत नाही. ती विद्यमान व्यवस्थेला प्रश्न विचारते. “राष्ट्रीयता मानवतेच्या आड येते”, टागोर यांचा हा विचार सर्जनशील विरोधाचाच नमुना आहे, जो द्वेषातून नव्हे, तर करुणेतून जन्म घेतो.
कला आणि विरोध हे एकमेकांचे सहप्रवासी आहेत, कारण दोघेही स्वातंत्र्याच्या शोधात असतात. कलाकार सत्तेला प्रश्न विचारतो आणि माणसाला स्वतःकडे पाहायला लावतो. ब्रेख्त म्हणतो, “कला वास्तवाचं प्रतिबिंब नव्हे, तर ते बदलण्याचं साधन आहे.” सर्जनशीलता समाजाशी संवाद साधते, आणि गरज भासल्यास वादही घालते. सत्ता स्वीकारणारा कलाकार स्थापित होतो, पण सर्जनशील मात्र राहत नाही. कारण खरी सर्जनशीलता संघर्षातून जन्म घेते. ती भीतीच्या पलीकडे जाऊन सत्य बोलते.
लोकशाही म्हणजे फक्त मतदान नव्हे; बोलण्याचा, प्रश्न विचारण्याचा आणि असहमती व्यक्त करण्याचा अधिकार म्हणजे लोकशाही. पण सत्ताधीश मौनाला सद्गुण ठरवतात, प्रश्न विचारणं देशद्रोह मानतात, तेव्हा लोकशाहीचा गळा घोटला जातो. पण दडपशाहीच्या अंधारात शब्द कधी मरत नाहीत. गॅलिलिओच्या “Eppur si muove” पासून सफदर हाशमीच्या “हल्ला बोल” पर्यंत शब्दांनी सत्तेला नेहमीच आव्हान दिलं.
कलाकार आणि लेखकांसाठी दडपशाही ही कसोटी असते. न्यायसंस्था, माध्यमं, राजकारण, सगळं भीतीच्या सावलीत असतं तेव्हा सच्चा कलाकार व्यक्त होतो. लोकशाही तग धरते ती त्याच्या असहमतीच्या स्वरांमुळे. म्हणून अभिव्यक्तीचं रक्षण हे राजकीय नव्हे, मानवी कर्तव्य आहे. कारण अंधार कितीही दाटला तरी शब्द नेहमी प्रकाशाकडे वाटचाल करतात.
शब्द फक्त उच्चार नसतात; ते इतिहासाचे साक्षीदार असतात. सत्ता गप्प बसवते तेव्हा शब्दच पहिला प्रतिकार करतात. सृजन म्हणजे सत्याचा पुनर्जन्म. त्यात बंडखोरी, वेदना आणि आशावाद असतो, आणि असतो माणसाच्या अस्तित्वाचा अखंड गजर. ग्रॉमशी म्हणतो ते आज तंतोतंत लागू पडतं. जुनं जग मृत्युपंथाला लागलं आहे, नवं जग जन्म घेण्यासाठी झगडतंय, आणि या दरम्यान मानवतेचे शत्रू डोकं वर काढतात. भीती, दडपशाही आणि असत्याचा भ्रमजाल पसरतो. या काळात सृजन करणे म्हणजे मानवतेच्या शत्रुंवर मात करणं आहे. प्रत्येक काळात लेखक-कलाकारांनी ही भूमिका बजावली आहे. शब्दांवर, स्वप्नांवर आणि प्रतिकारावर कलाकारांचा नेहमी विश्वास असावा. सृजन म्हणजे अन्यायाविरुद्ध उभं राहणं, सत्याचा शोध घेणं, मानवतेचं रक्षण करणं.