प्रत्येक भाषा शब्दांनी बनते. पण शब्द हे केवळ ध्वनी नसतात; ते अनुभवांचे, इतिहासाचे आणि सत्तासंबंधांचे वहन करतात. जगात हजारो भाषा आणि असंख्य बोलीभाषा आहेत. त्यात अब्जावधी शब्द आहेत. प्रत्येक शब्दाचा एक अर्थ असतो, पण तो एकच नसतो. त्याला अनेक स्तर असतात. त्या अर्थामागे सामाजिक, सांस्कृतिक, ऐतिहासिक, लिंगभावात्मक आणि भौगोलिक संदर्भ गुंफलेले असतात. म्हणूनच शब्द कधी निरपेक्ष नसतात. काळाच्या आणि समाजाच्या छायेत ते आकार घेतात. कोणत्याही शब्दाचा अर्थ, त्या त्या समाजाच्या विचारविश्वावर अवलंबून असतो.
याच प्रक्रियेत काही शब्द बदनाम होतात. काही शब्द हेतुपूर्वक बदनाम केले जातात. त्यांचे मूळ अर्थ बाजूला सारले जातात आणि त्यांना नवे, नकारात्मक अर्थ चिकटवले जातात. ‘विद्रोही’ हा असाच एक शब्द आहे. विद्रोही असणं म्हणजे काहीतरी धोकादायक, समाजविघातक किंवा अराजक असं चित्र रेखाटलं जातं. काही सत्ताधारी प्रवाह आणि लोकनियुक्त प्रतिनिधी सुद्धा असा गैरसमज पसारविण्यात भाग घेतात. परिणामी सामान्य माणसाच्या मनात भीती निर्माण होते. विद्रोह म्हणजे काहीतरी चुकीचं, असं त्याला वाटू लागतं. हळूहळू हा अपप्रचार समाजमान्य बनतो. त्यामुळे सर्जनशील, परिवर्तनशील असलेली संकल्पना संशयाच्या भोवऱ्यात अडकते.
विद्रोही असणं म्हणजे आंधळेपणानं विरोध करणं नव्हे. विद्रोह म्हणजे अन्याय, विषमता आणि असत्याला ठाम विरोध करण्याची वृत्ती. अशी वृत्ती असलेला माणूस गप्प बसत नाही. परिस्थितीला शरण जाण्याऐवजी तो तिचे परीक्षण करतो. तो प्रश्न उपस्थित करतो की हे असं का आहे आणि हे बदलता येईल का? त्याची भूमिका विध्वंसाची नसते, तर पुनर्रचनेची असते. तो चुकीच्या गोष्टी नाकारतो, पण योग्य पर्याय शोधतो. विद्रोह म्हणजे जागरूकता, संवेदनशीलता आणि जबाबदारी यांचा संगम आहे. त्यामुळे विद्रोही असणं म्हणजे समाजापासून दूर जाणं नाही, तर समाजाला अधिक न्याय्य बनवण्याचा प्रयत्न करणं होय.
मानवी इतिहास हा विद्रोहांचा इतिहास आहे. प्रत्येक मोठा बदल हा कोणत्यातरी विद्रोहातूनच घडलेला आहे. गुलामगिरीविरुद्धचे आंदोलन, स्त्रियांच्या अधिकारांसाठीची लढाई, वसाहतवादाविरुद्धचे संघर्ष ही सर्व विद्रोहाचीच रुपे आहेत. ब्रिटिश शासनसत्तेविरुद्ध एक शतक आपण निकराचा लढा दिला. जनतेने देशभर बंड पुकारले. तेव्हा आपल्याला स्वातंत्र्य मिळाले. इंग्रजांच्या अन्यायाविरुद्ध केलेला हा विद्रोहच होता. जेव्हा अन्याय मानगुटीवर बसतो, तेव्हा जनता त्याला आव्हान देते. हा प्रतिकार कधी शांततेतून तर कधी संघर्षातून असतो. त्यामागे बदलाची आकांक्षा असते. त्यामुळे विद्रोह हा अपवाद नाही; तो इतिहासाचा नियम आहे. समाजाला पुढे नेणारी ती विधायक शक्ती आहे.
विद्रोह फक्त नकार देत नाही; तो नवे निर्माण करतो. जुनी व्यवस्था मोडताना नवी मूल्ये उभी करतो. साहित्य आणि कलेच्या माध्यमांतून नव्या संवेदना निर्माण होतात. विद्रोहात सकारात्मकता असते, कारण तो परिवर्तनाची दिशा दाखवतो. तो अंधाराबद्दल जागरूक करतो; आणि प्रकाशाची वाट देखील दाखवतो. तो माणसाला निष्क्रिय ठेवत नाही. उलट त्याला कृतीशील बनवतो. त्यामुळे विद्रोह हा नाशाचा नव्हे, तर नवसर्जनाचा प्रवास आहे.
निसर्गातही सतत बदल होत असतो. जुने स्वरूप मोडते आणि नवे निर्माण होते. हीच प्रक्रिया मानवी जीवनातही दिसते. माणूस प्रश्न विचारतो, प्रयोग करतो आणि नवीन मार्ग शोधतो. हीच विद्रोही मानसिकता आहे. विज्ञानातील शोध, सामाजिक बदल आणि सांस्कृतिक प्रगती या सर्व गोष्टी प्रश्न विचारण्याच्या वृत्तीमुळे शक्य झाल्या. माणसाने प्रस्थापित गोष्टी निमुटपणे स्वीकारल्या असत्या, प्रश्न उपस्थित केले नसते, नाविण्याचा शोध घेतला नसता तर प्रगती झाली नसती. त्यामुळे विद्रोह हीच विकासाची मूलभूत शक्ती आहे.
विद्रोहाला बदनाम करणं म्हणजे प्रश्न विचारण्याच्या अधिकाराला कमी लेखणं होय. विद्रोहाला जेव्हा अराजक किंवा देशविरोधी ठरवलं जातं, तेव्हा समाजात भीती निर्माण होते. लोक प्रश्न उपस्थित करणं थांबवतात. लोकशाहीसाठी ही स्थिती धोकादायक असते. विद्रोह हा समाजाला सजग ठेवतो. त्यामुळे सत्तेवर लोकांचा अंकुश राहतो. त्यामुळे जनविरोधी सत्तेला जाब विचारण्याची प्रेरणा लोकांना मिळते. विद्रोहाला बदनाम करणं म्हणजे समाजाच्या प्रगतीला रोखणं. विद्रोही असणं हे प्रगतिशील असण्याचं लक्षण आहे. कोणी आपल्याला विद्रोही म्हटलं, तर तो आपला सन्मान समजावा. कारण आपल्या जागरूकतेचा आणि धैर्याचा तो पुरावा असतो.
समाजातील दांभिकता, आडंबर आणि जातीभेद यावर संत तुकारामांनी अभंगांमधून कोरडे ओढले. देवाला मंदिरात बंदिस्त न ठेवता सर्वसामान्यांच्या जीवनात आणले. त्यांच्या काव्यातून शोषितांच्या वेदना व्यक्त झाल्या. महात्मा ज्योतिराव फुलेंनी शिक्षणाला परिवर्तनाचे साधन बनवले. मुलींचे शिक्षण, सत्यशोधक समाजाची स्थापना आणि जातिव्यवस्थेवर प्रहार, या माध्यमांतून त्यांनी विषमतेला थेट आव्हान दिले. त्यांनी दाखवून दिले की ज्ञान हीच मुक्तीची किल्ली आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांनी अन्यायकारक आणि दडपशाही करणाऱ्या सत्तेविरुद्ध स्वराज्य उभारले. प्रशासनात न्याय, पारदर्शकता आणि लोकहिताला त्यांनी प्राधान्य दिले. शाहू महाराजांनी शिक्षण, आरक्षण आणि सामाजिक सुधारणा यांच्या माध्यमातून वंचित घटकांना मुख्य प्रवाहात आणण्याचा प्रयत्न केला. महात्मा गांधींनी सत्याग्रह आणि अहिंसेच्या मार्गाने सत्तेला प्रश्न विचारले. संघर्षाला त्यांनी नैतिक अधिष्ठान दिले.
रवींद्रनाथ टागोरांनी संकुचित राष्ट्रवादाला विरोध करून मानवतावादाचा विचार मांडला. राष्ट्रवादाच्या अतिरेकावर त्यांनी टीका केली. त्यांच्या मते संकुचित राष्ट्रवाद माणसाला विभाजित करतो. तो मानवतेपेक्षा राष्ट्राला सर्वोच्च मानतो. जागतिक बंधुत्व, सहअस्तित्व आणि सांस्कृतिक संवाद यांचा त्यांनी आग्रह धरला. त्यांच्या लेखनातून आणि विचारातून व्यापक, समावेशक आणि संवेदनशील जगाची कल्पना स्पष्ट होते.
भगतसिंगांनी हे स्पष्टपणे मांडले की क्रांतीचा अर्थ केवळ सत्तांतर नसून आर्थिक परिवर्तन आहे. आपल्या लेखनातून आणि कृतीतून त्यांनी शोषण आणि दडपशाहीविरुद्ध आवाज उठवला. पिळवणूक करणाऱ्या वर्गाच्या सत्तेला आव्हान देऊन समताधिष्ठित समाजरचना उभी करणे, हे त्यांचे ध्येय होते. त्यामुळे त्यांच्या क्रांतीची संकल्पना व्यापक, मूलगामी आणि परिवर्तनशील होती.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी समता, स्वातंत्र्य आणि बंधुता यांवर आधारित न्याय्य समाजरचनेचा मार्ग दाखवला. अस्पृश्यता, जातीय भेदभाव आणि सामाजिक अन्यायाविरुद्ध त्यांनी केवळ विचार मांडले नाहीत, तर प्रत्यक्ष संघर्ष उभा केला. त्यांनी वंचितांना हक्कांची जाणीव करून दिली. त्यांच्या मते परिवर्तनासाठी संस्थात्मक बदल आवश्यक आहेत. म्हणूनच त्यांनी संविधान, कायदे आणि धोरणांवर भर दिला. समान हक्क, प्रतिनिधित्व आणि शिक्षणाला प्राधान्य दिले. त्यांच्या विद्रोहात विचार, संघर्ष आणि रचनात्मक उपाय यांचा संगम दिसतो, ज्यामुळे तो परिवर्तनाचा भक्कम पाया ठरतो.
अशाप्रकारे अनेक विचारवंतांनी आणि समाजक्रांतिकारकांनी केवळ विरोधाची भूमिका घेतली नाही; तर संघर्षाला परिवर्तनाची ठोस दिशा दिली. त्यांनी दाखवून दिले की विद्रोह म्हणजे अराजक नव्हे, तर अन्यायकारक व्यवस्थेला चिकित्सक नकार आणि न्याय्य पर्यायांची निर्मिती आहे. जनविरोधी सत्तासंबंध, सामाजिक विषमता आणि आर्थिक पिळवणूकीबद्दल त्यांनी प्रश्न उपस्थित केले. त्याचवेळी नव्या मूल्यांची देखील त्यांनी मांडणी केली.
या विचारवंतांच्या कार्यात एक समान धागा आढळतो. समाजातील दडपलेल्या घटकांना त्यांनी केवळ स्वर दिला नाही, तर त्यांना सक्षम बनवण्याचाही प्रयत्न केला. त्यांच्या विद्रोहात द्वेष नव्हता; त्यात न्यायाची आकांक्षा होती. विध्वंसाची आंधळी प्रवृत्ती नव्हती; त्यात पुनर्रचनेची स्पष्ट जाणीव होती. म्हणूनच त्यांचा विद्रोह हा केवळ क्षणिक प्रतिक्रिया नव्हता. तो दीर्घकालीन सामाजिक परिवर्तनाचा पाया होता. त्यांनी उभे केलेले पर्यायी मार्ग आजही समाजाला दिशा देतात. हीच विद्रोही परंपरा आपल्याला पुढे घेऊन जायची आहे.
आजचा काळ केवळ बदलांचा नाही, तर मूलभूत उलथापालथीचा आहे. आपण ज्या जगात आहोत, ते हळूहळू रूप गमावत आहे. जे स्थिर वाटत होते, ते डळमळीत झाले आहे. विचार, मूल्ये आणि जगण्याच्या पद्धती सगळेच अस्थिर झाले आहे. सर्व बाबतीत अनिश्चितता जाणवत आहे.
मानवी समाज आता पुढे कोणत्या दिशेला जाणार? उन्नती करणार की अधोगतीला जाणार? पुढचे बदल मानवासाठी चांगले ठरतील, की विषमता आणखी वाढेल? तंत्रज्ञानामुळे माणूस स्वतंत्र होईल, की अधिक नियंत्रणाखाली जाईल? लोकांना मोकळेपणाने व्यक्त होता येईल, की त्यावर मर्यादा येतील? अशा प्रश्नांचे काहूर आज माजले आहे.
खरं तर आपण संक्रमणाच्या टप्प्यावर आहोत. आधुनिक म्हणविल्या जाणार्या ज्या मूल्यांनी समाजाचा पाया उभारला ती आज ढासळत आहेत. नवीन मूल्ये सुप्त अवस्थेत आहेत. त्यांनी जनमानसाची पकड अजून घेतलेली नाही. त्यामुळे संपूर्ण समाज संभ्रमावस्थेत सापडल्यासारखा वाटतोय. अशा वेळी समाजात गोंधळ वाढलाय. लोकांच्या मनात द्वंद्व निर्माण झाले आहे. जुने टिकवायचे की नवे स्वीकारायचे, या ताणातून दुविधा आणखी वाढत चालली आहे. अशा काळात विद्रोहाची सर्वाधिक गरज आहे.
हा सकारात्मक विद्रोह योग्य प्रश्नांपासून सुरू होईल. विषमता, अन्याय आणि असमान संधी हे आजचे कळीचे मुद्दे आहेत. जात, वर्ग, लिंग आणि आर्थिक विषमता यावर सातत्यानं बोलणं गरजेचं आहे. पर्यावरणाचा प्रश्नही तितकाच महत्त्वाचा आहे. विकासाच्या नावाखाली निसर्गाची होणारी हानी हा गंभीर मुद्दा आहे. कामगारांचे हक्क, शिक्षणाची गुणवत्ता, आरोग्यसेवेची उपलब्धता यावरही स्पष्ट भूमिका मांडावी लागेल. हे मुद्दे उपस्थित करणे म्हणजे केवळ विरोध करणे नाही. समाजाला अधिक समताधिष्ठित आणि संवेदनशील बनवण्याचा तो प्रयत्न आहे.
सकारात्मक विद्रोह केवळ विचारांपुरता मर्यादित राहत नाही. तो कृतीत उतरतो. शिक्षणाच्या माध्यमातून जागृती करणं, वंचित घटकांसोबत काम करणं, विविध पातळीवर संवादाचा मंच निर्माण करणं ही आजची महत्त्वाची कर्तव्ये आहेत. स्थानिक पातळीवर छोटे बदल घडवणं, सहकार्याची संस्कृती निर्माण करणं आणि पर्यायी उपक्रम उभरणं हेही विद्रोहाचेच रूप आहे. कृतीशिवाय विद्रोह अपूर्ण राहतो.
विद्रोह हा नकाराचा नाही, तर आशेचा मार्ग आहे. तो अंधाराची जाणीव देतो आणि प्रकाशाची दिशा दाखवतो. आज अशाच सर्जनशील विद्रोहाची गरज आहे. उद्याच्या उज्ज्वल भवितव्यासाठी कार्य करणाऱ्या प्रत्येकाने विद्रोही बनणे ही काळाची गरज आहे. हा विद्रोह द्वेष, विध्वंस किंवा आंधळ्या विरोधाचा नसेल, तर विचारपूर्वक परिवर्तनाचा असेल. अन्यायाला तो प्रश्न विचारेल, समतेचा आग्रह धरेल आणि नव्या शक्यतांचा शोध घेईल. अशा सर्जनशील विद्रोहातूनच समाज अधिक समताधिष्ठित, विचारशील आणि मानवी बनू शकेल. हा आशावाद केवळ स्वप्न नाही, तर सामूहिक प्रयत्नातून साकार होऊ शकणारी दिशा आहे.