आजचा काळ गोंधळाचा आहे. अनेक पातळ्यांवर दृश्य-अदृश्य ताण आहेत. संवाद हरवला आहे. कर्कशता वाढली आहे. मतभिन्नतेचा उपहास केला जातो. अशा काळात साहित्य आणि कलांची जबाबदारी कैक पटीने वाढली आहे. कारण, कोंडलेल्या मानवी मनांचे निश्वास याच मार्गे व्यक्त होऊ शकतात, लेखक, कलाकार, विचारवंत स्थिरतेला, जडतेला हादरा देतात. विवंचनांना, संघर्षांना स्वर देतात. हे सृजन कोंडी फोडू शकतं. माणसाला नवं बळ मिळू शकतं. त्रैमासिकाच्या रूपात आम्ही त्या दिशेनं एक छोटंसं पाऊल टाकत आहोत.
सृजनशीलता ही केवळ सौंदर्यनिर्मिती नसते. तो एक जिवंत हस्तक्षेप असतो. ‘सृजन’ द्वारे असा हस्तक्षेप करण्याचा आम्ही प्रयत्न करू. बंद दरवाजा जरा किलकिला करता येईल. खिडक्या जरा उघडता येतील. जाणिवांचा प्रकाश आणि वारा आपल्याला उभारी देईल.
सृजन म्हणजे नवनिर्मिती. फक्त वस्तू वा कलाकृती नव्हे, तर नव्या अर्थाची, दृष्टिकोनांची आणि जाणिवांची निर्मिती. सृजन ही जीवनशक्ती आहे. यातून आपण स्वतःला, इतरांना आणि जगाला समजून घेतो. ऋतूंचा बदल, बीजाचं वृक्षात रूपांतर, हे सर्व सृजनच. पण माणूस केवळ इथंच थांबत नाही. या पलीकडं काही शोधण्याचा तो प्रयत्न करतो. भाषा, संगीत, नृत्य, विज्ञान, कला आणि मूल्यव्यवस्था निर्माण करून स्वतःभोवती एक अर्थपूर्ण सृष्टी उभी करतो. सृजन आणि संस्कृती एकमेकांपासून वेगळे काढता येत नाहीत.
सर्जनशीलतेच्या अनंत शक्यता असलेला माणूस आज एकटा पडतो आहे. स्वतः पासून, समाजापासून, आणि निसर्गापासून तुटल्याची भावना त्याला कुंठित करत आहे. मानवी इतिहासतलं हे अभूतपूर्व मानसिक-सांस्कृतिक संकट आहे. बाबुराव बागूल एका कवितेते म्हणतात, “हे प्रतिभावान माणसा, तूच आहेस सर्व काही, तुझ्यामुळेच संजीव सुंदर झाली ही मही.” पण माणूस आज स्वतःचं अस्तित्व आणि महत्व हरवून बसला आहे. सुप्त क्षमतांपासून त्यानं तुटावं, गोलगोल वावटळीत भरकटत राहावं, अशी व्यवस्था रचली जात आहे. त्यामुळे सृजनाची आज अत्यंत गरज आहे. सृजनाच्या अनंत आणि बहुआयामी प्रक्रियाच माणसाला तारतील. समाजाला दिशा देतील.
सृजन म्हणजे अस्तित्वाच्या अफाट शक्यतांना वाट मोकळी करणारा मार्ग. कविता, चित्र, नाट्य, गीत, शिल्प हे सारं माणसाला स्वतःची ओळख देतं. सृजन हे वैयक्तिक असतं आणि सार्वजनिक देखील. माणूस स्वतःला शोधतो, त्याच वेळी सगळ्यांसाठी नवा अनुभव, विचार किंवा मूल्य निर्माण करतो. यासाठी अभिव्यक्ती स्वातंत्र्य, प्रश्न विचारण्याची मोकळीक, विविध दृष्टिकोनांचा स्वीकार, आणि संवेदनशील संवाद हवा. समाजजीवनाच्या प्रत्येक अंगात, केवळ कौशल्य म्हणून नव्हे, तर मूल्य म्हणून सृजनशीलता जोपासली पाहिजे. सृजन ही लेखक-कलाकारांपुरती गोष्ट नाही; प्रत्येकाचं माणूसपण टिकवून ठेवणारी ती मूलभूत मानवी प्रेरणा आहे. सृजन हरवलं, तर माणूसपणही हरवेल.
समाजातील विषमता आणि भेदाभेद सृजनशीलतेच्या आड येतात. व्यक्त होण्याच्या, स्वप्न बघण्याच्या, नवीन काही करण्याच्या मानवी प्रवृत्तींवर आज अनेक मर्यादा आहेत. बहुसंख्य लोक यापासून वंचित आहेत. अनेक क्षमतावान लोक सृजनाच्या प्रक्रियेबाहेर राहिल्याने प्रचंड सृजनात्मक सुप्तशक्ती वाया जाते. यामुळे मानवी समाजाचं प्रचंड नुकसान होतं. याच्या मुळाशी असते राज्यसत्ता आणि बाजारव्यवस्था, मानवी उमिना नियंत्रणात ठेवण्यासाठी राज्यसत्ता अनेक बंधनं लादते. माणसाला भरकटवण्यासाठी बाजारव्यवस्था सतत चलाखी करते. स्वतंत्र भारतात माणसाच्या मुक्त आणि स्वतंत्र जगण्यावर पहिल्यांदाच अशी बंधने आली आहेत.
विचार न करता आदेश पळणारी, ठरवलेल्या चौकटीत वागणारी माणसे राज्यसत्तेला हवी आहेत. अशीच माणसे ग्राहक आणि उपभोक्ता म्हणून बाजारव्यवस्थेला हवी आहेत. कल्पनाशक्ती असलेला, वेगळा विचार करणारा, प्रश्न विचारणारा माणूस या दोघांनाही नको आहे. म्हणून तळातून आलेलं, लोकसहभागी सृजन यांना नको आहे. कारण, सृजन म्हणजे नव्या शक्यतांचा शोध, नव्या वाटांचा प्रयोग. त्यातून व्यवस्थेपुढे आव्हानं उभी केली जाऊ शकतात. म्हणून सृजनाच्या प्रेरणा या व्यवस्थांना अस्वस्थ करतात. ते रोखण्यासाठी चकवे आणि भोवरे निर्माण केले जातात. अडथळे उभारले जातात.
माणसाने मात्र थांबू नये. चकव्या-भोवऱ्यात अडकू नये अन अडथळ्यांना घाबरू नये. त्याने स्वतःला व्यक्त करण्याचा, स्वतःची कहाणी सांगण्याचा आणि जीवनाच्या अर्थाचा शोध घेण्याचा सतत प्रयोग करायला हवा. तो त्याचा संविधानिक हक्क आहे. आणि वैश्विक पातळीवर मान्य केला गेलेला मानवअधिकार देखील आहे. कोणालाही तो नाकारता येणार नाही. हिरावून घेता येणार नाही. भौतिक परिस्थितीनुसार, उपलब्ध साधनांनुसार माणसानं मुक्तसृजन करावं. दलित, आदिवासी, स्त्रिया, अल्पसंख्यांक, कामगार, शेतकरी, शहरी आणि ग्रामीण वंचितवर्ग स्वतःचे अनुभव, भावना आणि विचार स्वतःच्या भाषेत आणि स्वतःच्या फॉर्ममध्ये मांडू लागतील. तेव्हा सृजन हे केवळ कलात्मक कृती राहणार नाही. ती सामाजिक क्रांतीकारी कृती बनेल. सृजनाला केवळ लेखन किंवा कलाक्षेत्रापुरते मर्यादित ठेऊ नये. समाजरचनेचा आणि जीवनशैलीचा तो अविभाज्य भाग बनावा. सृजनाच्या अनेक वाटा निर्माण व्हाव्यात. एक पायवाट आम्ही निर्माण करण्याचा प्रयत्न करतोय. नवे लेखकच नव्हे तर वाचक सुद्धा घडवायचं धेय्य बाळगलं आहे. तुटपुंज्या साधनात अंकाचं अर्थकारण सांभाळणं हे एक आव्हानच आहे. तुमची या कार्यात साथ मिळेल, या अपेक्षेसह.
1 Comment
Hi, this is a comment.
To get started with moderating, editing, and deleting comments, please visit the Comments screen in the dashboard.
Commenter avatars come from Gravatar.